आ. संजय गायकवाड यांच्यावर एकनाथ शिंदे यांचा विश्वास! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी...
Jun 3, 2025, 19:14 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ.गायकवाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आमदार गायकवाड यांची जिल्हा संघटक प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे..२०२२ मध्ये शिवसेनेत उठाव झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदार गायकवाड यांना जिल्हा संपर्कप्रमुख केले होते. आता शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत संपर्कप्रमुख हे पद रद्द करण्यात आले असून, त्याऐवजी जिल्हा संघटक प्रमुख अशी रचना करण्यात आली आहे...
आमदार गायकवाड यांना दिलेल्या नियुक्ती पत्रावर शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे शिवसेना यांची सही आहे.
नियुक्तीपत्रात म्हटले आहे की,वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे (उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या जिल्हा संघटक प्रमुख पदी (कार्यक्षेत्र बुलढाणा जिल्हा) आपली नियुक्ती करण्यात येत आहे. या नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे...