अखिल भारतीय सरपंच परिषदेची दखल;शासनाची देशमुख कुटुंबीयांना आर्थिक मदत! मृतक संतोष देशमुख यांच्या कुटुंबास अखिल भारतीय सरपंच परिषद घर बांधून देणार!
Dec 26, 2024, 09:33 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा संपूर्ण राज्यातून निषेध करण्यात येत आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेने देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून आरोपींना तातडीने जेरबंद करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. शिवाय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील अखिल भारतीय सरपंच परिषदेने सरकारच्या प्रतिनिधींना भेटून नागपूर अधिवेशनादरम्यान केली होती. याची दखल शासनाने घेतली असून शासनाच्या वतीने संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.
सरपंच,उपसरपंच, सदस्य यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी "अखिल भारतीय सरपंच परिषदचे शिष्टमंडळ या घटने संदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान १९ डिसेंबर रोजी परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधान भवन नागपूर येथे जाऊन मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. मृतक सरपंच देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे सांगून सरपंच हा गावगाड्यातील प्रमुख घटक असल्याने त्याची जर अशा पद्धतीने हत्या होत असेल तर त्यासाठी "सरपंच संरक्षण कायदा" करण्यात यावा, मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत, शासकीय नोकरी व स्व. सरपंच संतोष देशमुख यांचे स्मारक त्यांच्या गावी उभं करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा लाखाची आर्थिक मदत शासनाच्या वतीने विधानसभेत जाहीर केली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेवढीच मदत उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते सोमवार २३ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांच्या मस्साजोग या गावी जाऊन अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या उपस्थितीत त्यांच्या परिवाराला देण्यात आली .
मस्साजोग या गावी सरपंच परिषदेच्या वतीने सोमवारी राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या शिष्टमंडळाने जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांना सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत व सामाजिक मंत्री संजय शिरसाठ यांनी मृतक देशमुख यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी सरपंच परिषदेचे जयंत पाटील म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजानंतर एवढ्या क्रूरपणे हत्या ही सरपंच संतोष देशमुख यांची करण्यात आलेली आहे . यामुळे या गुन्ह्यातील सर्व आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.पंधरा वर्षे सरपंच असूनही देशमुख यांना स्वतःचे राहण्यासाठी घरही नव्हते, मामाच्या जुन्या वाड्यात राहत होते. पावसाळ्यात घरात पाणी यायच यामुळे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने संतोष देशमुख यांच्या परिवाराला घर बांधून देण्याची घोषणा सरपंच परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली . अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी घर बांधकामांसाठी १० हजार रुपयाचा चेक देऊन सुरुवात केली. यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष अनिल फेपाळे ,जळगावचे जिल्हाध्यक्ष रुपेश गांधी, चिखली तालुका अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर,
बुलढाणा तालुका अध्यक्ष दादा लवकर, अजय गायकवाड, उपसरपंच श्याम सावळे,, रामभाऊ जाधव, प्रदीप सोळंकी, रमेश अवचार, नागेश उबरहंडे, भिकनराव भुतेकर, संजय पाटील व सरपंच, संदीप ठाकूर गडचिरोली ,रामराव पाटील बोधवड जळगाव तसेच योगेश बोबडे सरपंच टेंभुर्णी , सचिन जगताप सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड उपाध्यक्ष बालाजी जगताप, सुहासदादा टोणपे प्रवक्ते, बापूसाहेब भोसले कुर्डू मा. सरपंच,बाळासाहेब ढेकणे यासह अनेक जिल्ह्यातील सरपंच उपस्थित होते.