POLITICAL SPECIAL खामगावात आकाश फुंडकरांना द्यावा लागणार १० वर्षांचा हिशोब! निष्क्रियतेचा डाग पुसावा लागणार;
काँगेसकडून आव्हान कुणाचे?.दिलीपकुमार सानंदा की पुन्हा ज्ञानेश्वर पाटील...
Oct 8, 2024, 10:39 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते, अशा परिस्थितीत सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. खामगाव विधानसभा मतदारसंघापूरते बोलायचे झाल्यास इथे भाजपचे आकाश फुंडकर दोन टर्मपासून आमदार आहेत. विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस कोणता उमेदवार देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला खामगाव आणि जळगाव जामोद या दोन मतदारसंघातून लीड मिळाला होता. त्या आधारेच महायुतीचे प्रतापराव जाधव यांनी चौथ्यांदा विजयाचा चौकार मारला. त्या निकालाच्या गोड आठवणी आ.आकाश फुंडकरांचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या आहेत. मात्र असे असले तरी १० वर्षांचा हिशोब आमदार फुंडकरांना जनतेसमोर मांडावा लागणार आहे.
निष्क्रिय आमदार म्हणून ठप्पा?
स्व.भाऊसाहेब फुंडकरांच्या पुण्याईने आकाश फुंडकर यांच्याकडे २०१४ मध्ये आमदारकी चालून आली. आधीच्या ५ वर्षात पूर्ण वेळ सत्ता त्यांच्या हाती होती, मात्र तरीही म्हणावा त्या गतीने विकास झाल्याचे मतदारसंघात दिसत नाही. काही चांगली कामे झाली असली तरी ज्या पद्धतीने केलेल्या कामांचा प्रचार व्हायला पाहिजे त्याच्या प्रसिद्धीत आ.फुंडकर कमी पडत आहेत. त्यामुळे नसले तरी निष्क्रिय आमदार हा ठप्पा काही प्रमाणात त्यांच्यावर बसलेला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनात्मक कामातही ते प्रभावी ठरले नव्हते. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा एक गट आ.फुंडकर यांच्यावर समाधानी नाही.एकंदरीत प्रस्थापित विरोधी लाटेचा सामना आ.फुंडकर यांना या निवडणुकीत करावा लागेल अशी चिन्हे आहेत.
काँग्रेसकडे उमेदवार कोण?
एका बाजूला आ.फुंडकर यांच्या बाजूला फारशी अनुकूल परिस्थिती नसली तरी या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेण्यात काँग्रेस देखील कमी पडत आहे. माजी आमदार सानंदा आणि ज्ञानेश्वर पाटील हे दोन तगडे इच्छुक काँग्रेस कडून आहेत. दोघांत फारसे जमत नाही. अंतर्गत गटबाजीने काँग्रेसचे संघटन कमकुवत झाले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सानंदा यांनी खांद्यावर घेतली होती, तेव्हा त्यांनी बऱ्यापैकी संघटनेवर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना बहुतांशी यश मिळाले. त्यामुळे उमेदवारीच्या लढतीत सानंदा यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.
शिवाय आमदारकीचा त्यांना गाढा अनुभव आहे त्यामुळे माजी आमदार सानंदा आ.आकाश फुंडकर यांच्यापुढे तगडे आव्हान निर्माण करू शकतात. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवात वंचित बहुजन आघाडीचा देखील मोठा वाटा होता.यावेळी वंचित चा प्रभाव कमी झालेला दिसत आहे, त्यामुळे काँग्रेससाठी ही दिलासादायक बाब आहे.
अर्थात एक एक दिवस जसा पुढे जाईल तसे चित्र आणखी सुस्पष्ट होत जाणार आहे...
मागील निवडणुकीचे असे होते चित्र...
खामगाव विधानसभा मतदारसंघ हा आधीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. १९७८ पासून आतापर्यंत ६ निवडणुका काँग्रेसने तर अलीकडच्या दोन निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकीत आमदार आकाश फुंडकर यांना ९० हजार ७७५ मते मिळाली होती. त्यांचा १६९६८ मतांनी विजय झाला होता. दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांना ७३ हजार ७८९ मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या शरद सुखदेव वसतकर यांनी तब्बल २५ हजार ९७५ मते घेत आकाश फुंडकरांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.