विमा कंपनीच्या विरोधात डॉ. ज्ञानेश्वर टाले व डॉ.ऋतुजा चव्हाण आक्रमक!
पीकविमा काढल्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीच्या मोबदल्यात विमा कंपनीकडून अल्प भरपाई देण्यात आली. मात्र, मेहकर-लोणार तालुक्यातील अद्याप लाखोंच्या जवळपास शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई पीकविमा मिळालाच नाही. ही सरळ सरळ आर्थिक फसवणूक असल्याचा आरोप डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी यावेळी केला.
मतदारसंघातील शेकडो शेतकऱ्यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारींचे निवेदन दिले. गेल्या खरीप हंगामात पावसाची संततधार होती. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली, तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर शेतकरीनेते रविकांत तुपकर यांनी विमा कंपनीच्या विरोधात महाराष्ट्रभर रान पेटविले होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारला होता. त्यामुळे विमा कंपनीकडून तात्पुरती काही मोजक्या शेतकरी बांधवांच्या बॅक खात्यात विमा रक्कम जमा करण्यात आली. मात्र आजही मेहकर मतदारसंघातील लाखो शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात विमा रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे विमा कंपनीकडून होत असलेला विलंब शेतकऱ्यांच्यासाठी त्रास दायक आहे. त्यामुळे मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांनी एल्गार पुकारात शेतकरीनेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ज्ञानेश्वर टाले व डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या नेतृत्वात पीकविमा कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरून साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारींचे निवेदन दिले. यावेळी पीकविमा कंपनीच्या विरोधात देण्यात आलेल्या आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.