पेटलेली मशाल गद्दारांच्या बुडाखाली आग लावेल! सुषमा अंधारेंचा बुलडाण्यात हल्लाबोल; जयश्रीताईंना दिल्या विजयाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा!
Oct 29, 2024, 16:48 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्रात महिलांची अब्रू सुरक्षित नाही. बदलापूरच्या घटनेनंतरही या राज्यात पुन्हा पुन्हा अत्याचार होतच आहेत. आमच्या लेकी-बाळी सुरक्षित नाही. त्यामुळे बायाहो विचार करा..१५०० रुपये जास्त की तुमच्या आमच्या लेकीबाळींची अब्रू जास्त? असा सवाल करीत लेकीबाळींची अब्रू सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला मतदानातून मशाल पेटवावी लागेल..ही पेटलेली मशाल गद्दारांच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात उबाठा शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या, स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांनी केला. जयश्रीताई शेळके या विदर्भातील सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या आमदार असतील असे भाकीत करीत त्यांनी जयश्रीताई शेळके यांना विजयाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा देखील दिल्या. बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जयश्रीताई शेळके यांनी आज,२९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरला यावेळी आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना सुषमा अंधारे बोलत होत्या.
यावेळी पुढे बोलतांना सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीवर प्रचंड हल्लाबोल केला.सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीच्या कार्यक्रमावर हल्लाबोल केला. तुम्ही बहिणीचे लग्न केले असतील, त्यासाठी कर्ज काढले असतील मात्र तुम्ही कधी त्याची प्रसिद्धी केली का? असा सवाल त्यांना उपस्थित गर्दीला केला.१५०० रुपयांपेक्षा आमच्या लेकीबाळींची अब्रू जास्त महत्त्वाची आहे असेही त्या म्हणाल्या.
जालिंधर बुधवतांचे केले कौतुक..
यावेळी सुषमा अंधारे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांचे कौतुक केले. शिवसेनेमध्ये जालिंदर बुधवत यांच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक आहेत म्हणून शिवसेना कधीच संपत नाही असे म्हणत सुषमा अंधारे म्हणाल्या. लोकसभेला मत विभाजनाचा फटका बसला म्हणून आमचा पराभव झाला.मात्र आता आम्ही त्याबद्दल काळजी घेतली आहे.. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके या विदर्भातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदार असतील असे सुषमा अंधारे म्हणाल्या. राज्यात शेतकरी संकटात आहे. सोयाबीन कापसाला भाव नाही.. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कापसाला १२ हजार भाव होता असे सुषमा अंधारे म्हणाल्या
यावेळी सुषमा अंधारे यांनी आमदार गायकवाड यांचे नाव न घेता त्यांच्यावरही हल्लाबोल केला. "आग्या मोहळ" चा संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेला डायलॉग त्यांनी पुन्हा सांगितला यावेळी उपस्थित गर्दीतून एकच हशा पिकला. ज्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना धडा शिकवा. गुंडगिरी, हुकूमशाही हाणून पाडा असे म्हणत त्यांनी जयश्रीताई शेळके यांच्या विजयासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले..