सामान्यांना देशोधडीला लावणारा अर्थसंकल्प! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे टीकास्त्र; म्हणाले, शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नाही...
Mar 10, 2025, 19:57 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा देशोधडीला लावणारा अर्थसंकल्प
आहे. सरकार स्थापन झाल तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र थांबणार नाही. मात्र महाराष्ट्र आता थांबलेला आहे. महाराष्ट्र आता मागे जात आहे. कारण उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. लाडक्या बहिणींना देखील फसवण्यात आले आहे. कर्जमाफी करण्याची त्यांनी घोषणापत्रात केलं होतं त्याची देखील अंमलबजावणी झाली नाही असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पावर केला आहे..
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तोफ डागली आहे. हा बिनकामाचा अर्थसंकल्प आहे, महाराष्ट्रातील जनतेला देशोधडीला लावणारा हा अर्थसंकल्प आहे. उद्योजकांचे हित आणि सामान्यांचे मरण असेच महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे. सामान्य माणूस मेला तरी त्यांना फरक पडत नाही. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलेले नाही.. अर्थसंकल्पावर सत्ताधिकारी स्वतःची पाठ थोपटून घेत असले तरी आतापर्यंतचा सर्वात वाईट अर्थसंकल्प म्हणून या अर्थसंकल्पाची गणना होईल असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले...