ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान! म्हणाले,रविकांत तुपकरांशिवाय तिसरी आघाडी पूर्ण होऊ शकत नाही! तुपकरांना `वंचित´ च्या आघाडी सोबत घेण्यासाठी साद घालणार..?
Sep 23, 2024, 13:24 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीसोबत जाणार नसल्याचे सांगत असतांनाच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशिवाय ही तिसरी आघाडी पूर्ण होऊ शकत नाही असे, मोठे विधान मुंबई येथे केले आहे. मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना ते बोलत होते. आता ॲड. आंबेडकर तिसऱ्या आघाडीत जाणार नसल्याचे स्पष्ट झाले असून रविकांत तुपकरांना आपल्या सोबत घेण्यासाठी ते साद घालणार असल्याचे देखील सूत्रांकडून कळते आहे. हे दोन्ही नेते एकत्र आल्यास येणाऱ्या विधानसभेत एक नवे समीकरण राज्यात तयार होऊ शकते,हे विशेष.
बच्चू कडू,संभाजी राजे आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विधानसभेसाठी तिसरी आघाडी तयार करण्यात आली आहे. या तिसऱ्या आघाडी सोबत ॲड. प्रकाश आंबेडकर जातील की नाही याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. दरम्यान मुंबई येथे पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता आपण तिसऱ्या आघाडी सोबत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यासोबतच तिसऱ्या आघाडी बाबत बोलतांना त्यांनी एक मोठे विधान देखील केले आहे. राजू शेट्टी व इतरांनी मिळून राज्यात तिसरी आघाडी निर्माण केली आहे, परंतु या तिसऱ्या आघाडीमध्ये शेतकरी चळवळीत राज्यभर प्रभाव असणारे आणि मोठा जनाधार असणारे रविकांत तुपकर मात्र नाही आहेत. त्यामुळे ही तिसरी आघाडी शेतकरी संघटना म्हणून पूर्ण आहे असे मी मानत नाही, असे आंबेडकर यांनी सांगितले.
रविकांत तुपकर यांची शेतकरी चळवळीत राज्यभर मोठी ताकद आहे. राजू शेट्टी यांनी तुपकरांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाजूला केले असले तरी स्वाभिमानीच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी मात्र तुपकरांना साथ दिली आहे. २७ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते तुपकरांच्या सोबत आहेत. तमाम शेतकरी व तरुण शेतकरी पुत्रांचा बुलंद आवाज म्हणून रविकांत तुपकर यांना राज्यभर ओळखले जाते त्यामुळे रविकांत तुपकर जर तिसऱ्या आघाडीत नसतील तर ती तिसरी आघाडी पूर्ण होऊ शकत नाही, असे सांगत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठा सूचक इशारा देखील दिला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर हे स्वतः तिसऱ्या आघाडी सोबत जाणार नाहीत आणि रविकांत तुपकर तर आधीपासूनच तिसऱ्या आघाडीमध्ये नाहीत त्यामुळे हे दोघे नेते आता येणाऱ्या विधानसभेसाठी एकत्र आले तर एक नवे समीकरण तयार होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे रविकांत तुपकरांना सोबत घेण्याची चाचपणी करीत असल्याचे बोलले जात आहे त्यासाठी प्रकाश आंबेडकर तुपकरांना साद घालणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप रविकांत तुपकर आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा त्यांची अधिकृत बैठकही झाली नाही. पण या दोन नेत्यांमध्ये चर्चा आणि बैठक घडवून आणण्याच्या प्राथमिक हालचाली सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
रविकांत तुपकरांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असूनही अडीच लाख मते घेतली. सिंदखेडराजा मतदारसंघात रविकांत तुपकरांना ३० हजार मतांची आघाडी होती. तर बुलढाणा, मेहकर आणि चिखली मतदारसंघात तुपकरांना लक्षणीय मते मिळाली. राजू शेट्टींपासून वेगळे झाल्यानंतर राज्यातील २७ जिल्ह्यात रविकांत तुपकरांचे कार्यकर्ते आणि संघटन मजबूत आहे. आंबेडकर आणि तुपकर एकत्र आल्यास याचा फायदा विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकते. शिवाय वंचित बहुजन आघाडीतील सर्व समाज घटक आणि रविकांत तुपकर यांच्या पाठीशी असलेली राज्यभरातील शेतकरी चळवळीची ताकद एकत्र आली तर एक मोठा सक्षम पर्याय जनतेसमोर उभा राहू शकतो, त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर रविकांत तुपकरांना सोबत घेण्यासाठी साद घालणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप या दोन्ही नेत्यांची याबाबत कोणतीच बोलणे झालेली नाही, मात्र त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. आता याबाबत नेमक्या समोर काय घडामोडी घडतात आणि या नव्या राजकीय मैत्रीचा काय निर्णय लागतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.