51 ग्रामपंचायतींमध्ये सत्तेसाठी ताई, भाऊ, दादा, साहेब उतरले मैदानात! 28 ठिकाणी चुरस शिगेला; वारीवर गेलेले थेट पहिल्या सभेतच अवतरणार!!
सरपंच पदासाठी बुलडाणा तालुक्यात घमासान
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या व राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बुलडाणा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींमधील निवडणुकांचे निकाल लागल्यावर व आरक्षण निघाल्यावर शेवटच्या टप्प्यात आता मोठे नेते पुढे सरसावले असून, ग्रामीण भागात आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावल्याचे वृत्त आहे.
तालुका एक असला तरी यात बुलडाणा व चिखली या दोन विधानसभा मतदारसंघांतील गावांचा समावेश आहे. यामुळे नेते व पॅनेल प्रमुख, सूत्रधार यांच्यासह 500 पेक्षा जास्त सदस्य दुपटीने आक्रमक असल्याचे चित्र आहे. यामुळे आरक्षण काय निघते याची तमा न बाळगता अनेक गावांतील सदस्य राजकीय सहलीसाठी रवाना झालेत. हे सदस्य थेट निवडणुकीच्या दिवशीच गावात अवतरणार आहेत. आमदार श्वेता महाले पाटील, संजय गायकवाड, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, विजयराज शिंदे यांच्यासह सेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्यात वर्चस्वाची छुपी लढत रंगत आहे. बहुतेक ठिकाणी महा आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. देऊळघाट, धाड, रायपूर, चांडोळ, पाडळी, सागवान, कोलवड, दुधा, मढ, अंभोडा, अजीसपूर, गुम्मी, मासरूळ, तांदुळवाडी, दहिद बुद्रुक, नांद्रा कोळी, डोंगर खंडाळा, केसापूर, पांगरी, बिरसिंगपूर, जनुना आदी 28 ठिकाणचा सत्तेचा खेळ कल्पनेपलिकडचा म्हणूनच थरारक ठरलाय.