14 टेबल, 17 फेर्या अन् 2 वाजेनंतर गुलाल…; बुलडाणा तहसीलची मतमोजणीची जय्यत तयारी
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या 444 सदस्य पदांचा फैसला उद्या, सोमवारच्या (दि.18 जानेवारी) मुहूर्तावर होणार असून, दुपारी 2 वाजेपर्यंत तहसील व 48 ग्रामपंचायतींचा आसमंत गुलालाने माखलेला असणार आहे. सागवान, देऊळघाट व चांडोळ या गावात ढोलताशांच्या तालावर रंगणारा गुलालाचा विजयी खेळ सर्वांत अगोदर सुरू होणार आहे. मात्र हा जल्लोष होशमध्येच साजरा करावा लागणार आहे. कारण सर्व गावांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
48 मतदान केंद्रांवरील मतदान सुरळीत पार पडल्यावर तहसीलदार रुपेश खंडारे यांनी मतमोजणीची जय्यत तयारी केली. आज नियुक्त 49 कर्मचार्यांना त्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. तहसील कार्यलयाच्या प्रांगणात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. संपूर्ण निवडणूक नियोजनबद्ध रीतीने हँडल करणारे तहसीलदार श्री. खंडारे यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना या तयारीची व नियोजनाची माहिती दिली. मतमोजणीसाठी 14 टेबल राहणार असून, एका टेबलवर पोस्टल मतांची मोजणी होईल. 13 टेबलवर प्रत्येकी एकेक पर्यवेक्षक, सहायक व कोतवाल राहणार आहे. सुमारे 538 पोस्टल मतांच्या टेबलवर 1 पर्यवेक्षक व 8 सहायक राहणार आहेत. सागवान, देऊळघाट व चांडोळ या ग्रामपंचायतींपासून मोजणीला प्रारंभ होणार आहे. यानंतर धाड, डोंगरखंडाला, रायपूर, साखळी बुद्रुक, धामणगाव, जांब, म्हसला बुद्रुक, कुंबेफळ, कुलमखेड, सातगाव म्हसला, डोमरूळ, वरुड, मासरूळ, भडगाव, सावळी, मातला, जनुना, मढ, चौथा, पाडळी, रुईखेड टेकाळे, तराडखेड, पलसखेड, जामठी, दहिद खुर्द, देवपूर, दुधा, माळवंडी, बिरसिंगपूर, दहिद बुद्रुक, हतेडी बुद्रुक, अंभोडा, केसापूर, नांद्रा कोळी, तांदुळवाडी, कोलवड, अजीसपूर, शिरपूर, वरवंड, भादोला, पांगरी, मालविहिर, बोरखेड, सोयगाव व गुम्मी या क्रमाने मोजणी करण्यात येईल, असे तहसीलदारांनी स्पष्ट केले.