सरकारने पाहणीचा खेळ न करता तात्काळ भरपाई देऊन बळीराजाचे अश्रू पुसावे!; रविकांत तुपकर यांची “रोख’ठोक मागणी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतात गेल्यावर झालेले प्रचंड नुकसान डोळ्यांनी ठळकपणे दिसून येते. त्यामुळे क्षेत्राची तंतोतंत जुळवणी किंबहुना औपचारिक कारवाईत वेळ न घालवता ही हानीच पंचनाम्यांवर ग्राह्य धरून राज्य शासनाने तातडीने बळीराजाच्या बँकखात्यावर भरपाईची रक्कम जमा करावी व त्यांचे अश्रू पुसावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली …
 
सरकारने पाहणीचा खेळ न करता तात्काळ भरपाई देऊन बळीराजाचे अश्रू पुसावे!; रविकांत तुपकर यांची “रोख’ठोक मागणी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतात गेल्यावर झालेले प्रचंड नुकसान डोळ्यांनी ठळकपणे दिसून येते. त्यामुळे क्षेत्राची तंतोतंत जुळवणी किंबहुना औपचारिक कारवाईत वेळ न घालवता ही हानीच पंचनाम्यांवर ग्राह्य धरून राज्य शासनाने तातडीने बळीराजाच्या बँकखात्यावर भरपाईची रक्कम जमा करावी व त्‍यांचे अश्रू पुसावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

येळगाव धरणाखालील नदीकाठच्या शेतांमध्ये जाऊन श्री. तुपकर यांनी काल, २९ सप्‍टेंबरला नुकसानीची पाहणी केली. आस्मानी संकटाने खचलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला. तातडीने आर्थिक मदत मिळण्यासाठी सरकारकडे बळीराजाची बाजू रेटून धरणार असल्याचे ते म्हणाले. येळगाव धरणाखालील विविध गावांमधून गेलेल्या पैनगंगा नदीने रुद्रावतार धारण केल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. पिके होत्याची नव्हती झाली. अजूनही पिके पाण्याखाली आहेत.

पुरामुळे शेतजमिनही खरडून गेली आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी किचकट वाट काढत रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. झालेली प्रचंड हानी पाहून तुपकरांनी दु:ख व्यक्त केले. आस्मानीचा मार शेतकऱ्यांना बसला आहे. मात्र सुलतानीचा तडाखा बसू देणार नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत श्री. तुपकर यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. पंचनामे, नेत्यांचे दौरे यापेक्षा थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे काम शासनाने करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळचे नुकसान मोठे आहे. शासनाने इतर सर्व प्रकल्प, योजना थांबवून शेतकऱ्यांना मदत देण्यास सर्वोतोपरी प्राधान्य द्यावे, असे तुपकर यावेळी म्हणाले.

…तर लोकप्रतिनिधींचे भत्ते थांबवून मदत करा -तुपकर
शासनाकडे मदतीसाठी पैसे नसतील तर आमदार, खासदार आणि मंत्र्यांवर होणारा खर्च वर्षभरासाठी थांबवावा. त्यातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही श्री. तुपकर यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान केली.