शिवसंपर्क अभियानाला उत्साही प्रतिसाद; शिवसेना जिल्हाप्रमुख बुधवत यांची माहिती
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 12 जुलैपासून सुरू झालेल्या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला आतापर्यंत उत्साही प्रतिसाद मिळाला असून, ग्रामीण भागातील जनता आजही शिवसेनेच्या पाठिशी भरभक्कमपणे उभी असल्याचे दिसून आल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.
या अभियानाच्या धामधूमीत त्यांनी “बुलडाणा लाईव्ह’सोबत संवाद साधताना हा दावा बोलून दाखवला. यावेळी त्यांनी अभियानाची पार्श्वभूमी, उद्देश, त्यासाठीचे नियोजन याची माहिती दिली. यावेळी जिल्हाप्रमुख बुधवत म्हणाले, की 8 जुलै रोजी मुंबईस्थित शिवसेना भवनात पक्षाची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान राबविण्याचे आदेश देऊन त्यावर सविस्तर मार्गदर्शनही केले. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्याचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील 60 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गणाच्या केंद्रस्थानी परिसरातील गावांच्या बैठका घेण्याचे ठरले. यावेळी तालुका प्रमुख व उप प्रमुखांची उपस्थिती बंधनकारक आहे. याशिवाय शक्यतेनुसार उप जिल्हा प्रमुख व अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहील. मात्र यावेळी कोरोना विषयक निर्देश व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या अभियानाचा आपल्या कार्यक्षेत्रातील बुलडाणा, चिखली ,मोताळा, देऊळगाव राजा व सिंदखेडराजा या तालुक्यांसह जिल्ह्यात थाटात शुभारंभ झालाय.
काय आहे उद्देश…
दरम्यान, शिवसंपर्क अभियानाच्या उद्देशाबद्दल श्री. बुधवत म्हणाले, की मोहिमेला अनेक कंगोरे असून, ती बहुद्देशीय आहे. मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी व संघटनात्मक विस्तार हा मुख्य उद्देश आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजवरच्या कालावधीत घेतलेले लोकाभिमुख निर्णय, केलेली अंमलबजावणी, सुरू केलेल्या विकास योजना, त्याचे सर्वसामान्यांना झालेले लाभ, महत्त्वपूर्ण योजनांसाठी दिलेला निधी यांची माहिती ग्रामीण भागातील सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविणे व त्यांचे जाहीर वाचन हाही महत्त्वाचा हेतू आहे. याशिवाय परिसरातील गावांच्या समस्या, स्थानिक प्रलंबित योजना वा एखाद्या योजनेत ती गावे अपात्र ठरली असल्यास त्याची कारण मीमांसा करणे, जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची माहिती मुख्यमंत्री व पक्षाला देणे अशी अनेक पूरक उद्देश असल्याचे श्री. बुधवत यांनी स्पष्ट केले. याशिवाय ग्रामीण भागात कोरोना लसीकरण वाढविणे, दुसरा डोस मिळवून देण्यासाठी मदत करणे, संबंधित आरोग्य केंद्रात त्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. याशिवाय कोरोनामुळे आईबाप गमावलेल्या निराधार मुलांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम हाती घेण्यात येईल. यामुळे अभियानातही शिवसेनेच्या 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण या तत्वाचे पालन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.