युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर रविकांत तुपकर आक्रमक; सरकारवर कैलास नागरे यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करा म्हणाले...
Updated: Mar 13, 2025, 13:47 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील शेतकरी कैलास नागरे यांनी आज आत्महत्या केली. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळावे यासाठी कैलास नागरे यांनी सातत्याने आंदोलनाची भूमिका घेतली होती. डिसेंबर महिन्यात त्यांनी अन्नत्याग आंदोलन देखील केले होते. मात्र त्यावेळी शासनाने दिलेला शब्द न पाळल्याने कैलास नागरे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी कैलास नागरे यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहिली.. शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी आपण आहुती देत आहोत असे कैलास नागरे यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. दरम्यान या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले आहे. जनमानसातून सरकारबद्दल अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील यावर उद्विग्न होत प्रतिक्रिया दिली आहे.. कैलास नागरे यांची आत्महत्या नसून निर्ढावलेल्या शासनाने केलेला खून आहे, त्यामुळे राज्य सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करावा असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे..
कैलास नागरे यांनी लिहिलेली सुसाईड नोट काळीज पिळवटून टाकणारी आहे. मात्र या सरकारला काळीज आहे का? असा सवाल तुपकर यांनी केला आहे. कैलास नागरे यांची मागणी पाण्यासाठी होती.. खडकपूर्णा धरणातील पाणी पाझर तलावांमध्ये सोडल्यास शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळेल, यासाठी कैलास नागरे आग्रही होते. मात्र शासनाने मागणीची दखल न घेता त्यांचे आंदोलन गुंडाळले..दिलेला शब्द पाळला नाही. पाण्यासाठी जर शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत असेल तर यापेक्षा दुर्दैव ते कोणते? असा सवालही तुपकर यांनी केला आहे. सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करावा असेही रविकांव तुपकर म्हणाले..