या 3 नेत्‍यांमुळे शेगावच्‍या त्‍या 23 गावांतून काँग्रेस होणार हद्दपार!; निष्ठावंतांची संतप्‍त भावना!!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उदासीन पदाधिकारी, त्यांच्यामुळे चैतन्य हरवलेले कार्यकर्ते यामुळे जळगाव जामोद मतदारसंघात समाविष्ट असलेल्या शेगाव तालुक्यातील 23 गावांत काँग्रेस नावालाच उरली असल्याचे भीषण परंतु सत्य चित्र आहे. याला कारणीभूत आहेत, ते सध्याचे नावालाच पक्षाचे बिरूद लावून मिरवणारे पदाधिकारी. त्यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याची खंत सामान्य कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः उदासीन पदाधिकारी, त्‍यांच्‍यामुळे चैतन्य हरवलेले कार्यकर्ते यामुळे जळगाव जामोद मतदारसंघात समाविष्ट असलेल्या शेगाव तालुक्‍यातील 23 गावांत काँग्रेस नावालाच उरली असल्याचे भीषण परंतु सत्‍य चित्र आहे. याला कारणीभूत आहेत, ते सध्याचे नावालाच पक्षाचे बिरूद लावून मिरवणारे पदाधिकारी. त्‍यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याची खंत सामान्य कार्यकर्त्यांतून व्‍यक्‍त होत आहे. काही महिन्यांवर शेगाव नगरपरिषदेची निवडणूक आली असताना नावापुरते मिरवणाऱ्या पदाधिकाऱ्यांमुळे कामगिरी कशी राहील, याचीच चिंता सध्या निष्ठावंतांत आहे.

एक काळ होता जेव्‍हा काँग्रेसचा शेगाव जणू बालेकिल्लाच होता. आता दिवसेंदिवस पक्षाला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे आणि याला कारणीभूत सध्याचे पदाधिकारी ठरत आहेत. अशोकराव हिंगणे जवळपास १६-१७ वर्षे तालुकाध्यक्ष होते. १९८५ पासून ते काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. अभ्यासू व्‍यक्तिमत्त्व असलेल्या हिंगणे यांची पक्षनिष्ठा, रोखठोक भूमिका पक्षाला वाढवणारीच ठरली. पक्षाची ध्येयधोरणे त्‍यांच्‍या काळात समाजाच्‍या शेवटच्‍या घटकापर्यंत पोहोचत होती. आजही निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्‍यांना ओळखले जाते. ती कार्यक्षमता, झलक, पक्षनिष्ठा सध्याचे तालुकाध्यक्ष विजय काटोले यांच्‍यात दिसत नसल्याची खंत कायकर्ते खासगीत व्‍यक्‍त करत असतात. पक्षातील पदाचा उपयोग सत्तेचा सोपान चढताना होत असला तरी, पक्ष वाढीतील यांचे योगदान मात्र नावालाही नसल्याची भावना निष्ठावंत कार्यकर्त्यांत आहे. स्‍वतः पंचायत समिती सभापती, त्‍यानंतर त्‍यांच्‍या आईसुद्धा पंचायत समिती सभापती राहिल्या आहेत. वर्षभरापासून ते तालुकाध्यक्ष आहेत. पण वर्षभरात त्‍यांनी पक्ष किती पुढे नेला, हा शोध महत्त्वपूर्ण ठरावा. केवळ मिरवण्यापुरते एखाद्या नेत्‍याला पद असते का, असा प्रश्न त्‍यामुळेच कार्यकर्ते विचारत असतात.

शेगाव तालुका हा जळगाव जामोद आणि खामगाव अशा दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विखुरलेला आहे. त्यामुळे, या दोन्ही मतदारसंघाचे काँग्रेस नेते आपले समर्थक तालुका कार्यकारिणीवर नियुक्त करण्यासाठी प्रयत्‍न करत असतात. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी शेगाव तालुक्यातील विजय काटोले यांना शेगाव तालुकाध्यक्ष पदावर विराजमान केलेले आहे. ते खामगाव विधानसभा मतदारसंघातील भोनगावचे रहिवासी. त्‍यामुळे त्‍यांचा ओढा खामगाव मतदारसंघाकडे. त्‍यामुळे आपोआपच जळगाव जामोद मतदारसंघातील 23 गावांकडे दूर्लक्ष होत आले आहे.

एकीकडे तालुकाध्यक्षांबद्दल वाढत्‍या तक्रारी असताना महिला आघाडीच्‍या तालुकाध्यक्षाही नावालाच असल्‍याचा सूर महिला कार्यकर्त्यांमध्ये आहे. गेल्या १७- १८ वर्षांपासून एकाच महिलेकडे तालुकाध्यक्षपद असून, संघटनात्मकदृष्टया पक्षाला कोणताही लाभ होत नसल्याने त्‍यांच्‍याऐवजी एखाद्या कार्यक्षम महिलेकडे हे पद द्यावे, अशी मागणी अनेकदा होत आली आहे. मात्र वारंवार पक्षश्रेष्ठींनी या मागणीकडे केलेले दूर्लक्ष आजघडीला पक्षासाठीच मारक ठरत आहे. शहरातून दोन वेळा त्‍यांनी काँग्रेसतर्फे नगरपरिषदेची निवडणूक लढवली, दोन्‍ही वेळा हरल्या. असे असूनही त्‍यांनी पक्षातील पद मात्र जाऊ दिले नाही. त्‍या मूळच्‍या अकोला जिल्ह्यातील वझेगावच्‍या आहेत. त्‍यामुळे तालुक्‍यात त्‍या पक्ष वाढवू शकल्या नाहीत, महिलांना जोडू शकल्या नाहीत, असा आरोप होत असतो. तो आरोप त्‍यांच्‍या एकूण कारकिर्दीवर नजर टाकली तर खराच ठरत असल्याचे दिसते. महिला आघाडीच्‍या शाखाही तालुक्‍यात कुठे दिसत नाहीत, हे विशेष.

काँग्रेसतर्फे जळगाव जामोद मतदारसंघाचे नेतृत्त्व डॉ. स्वातीताई वाकेकर करतात. त्‍यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणूक पक्षाकडून लढली होती. मात्र संजय कुटे 35 हजार मतांनी निवडून आले. त्‍या जलंब मतदारसंघाचे 15 वर्षे आमदार राहिलेल्या कृष्णराव इंगळे यांच्‍या कन्या आहेत. मात्र वडिलांसारखी लोकप्रियता त्‍यांना आजवर प्राप्‍त करता आली नाही. केवळ वडिलांची लोकप्रियता आणि वारसा त्‍यांना आजवर तारत आल्याचेच दिसून येत आहे. 2019 च्‍या निवडणुकीत शेगाव तालुक्‍यातून त्‍यांना आ. कुटेपेंक्षा केवळ 300 मते कमी मिळाली. तरीही त्‍यांचा शेगावप्रतीचा सापत्‍न भाव कायम असल्याची टीका सामान्य कार्यकर्ते करत असतात. कार्यक्षमतेच्‍या बाबतीत प्रश्न उठत असले तरी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद त्‍या बाळगून आहे, हे विशेष.