मोताळा, संग्रामपूर नगरपंचायतींच्या निवडणुका एप्रिलमध्ये?
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः कधीचीच मुदत संपलेल्या मोताळा, संग्रामपूर नगरपंचायतींच्या निवडणूक मुहूर्ताची राजकारण्यांना आतुर प्रतीक्षा आहे. निवडणुकांचा मुहूर्तच ठरत नसल्याने राजकीय पक्ष, मावळत्या 34 नगरसेवकांसह शेकडो इच्छुकांना आता या निवडणुकांच्या मुहूर्ताचे तीव्र वेध लागले आहेत. बुलडाणा लाइव्हच्या हाती आलेल्या खात्रीलायक माहितीनुसार या निवडणुका एप्रिलमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे.
या संस्थांच्या निवडणुकांची पूर्वतयारी अगोदरच करण्यात आली. मात्र कोरोना प्रकोपामुळे निवडणूक लांबल्या. आता प्रभाग रचना व आरक्षणावर मोठ्या संख्येने प्राप्त हरकती व सुचनांचा निपटारा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याने मार्च महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता मावळली आहे. 25 नोव्हेंबर 2020 रोजीच या नगर पंचायतींची मुदत संपली आहे. यामुळे मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांची मोताळा तर जळगाव जामोद एसडीओंची संग्रामपूर नगर पंचायतीचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी सरत्या वर्षाअखेर निवडणुकीची पूर्वतयारी करण्यात आली. प्रभाग रचना, सदस्य पदाचे आरक्षण, हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी, विभागीय आयुक्तांनी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे हे प्रशासकीय सोपस्कार ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 मध्येच पार पडले. त्यानंतर मतदार यादी कार्यक्रमाची जानेवारीपासून प्रतीक्षा लागली. अखेर ग्रामपंचायत लढतीचा धुराळा खाली बसल्यावर कुठे हा कार्यक्रम लागला आहे. यानुसार 15 फेब्रुवारीला दोन्ही नगरपंचायतींची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यावर 22 फेब्रुवारीपर्यंत मतदारांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या. ही बाब लक्षात घेता फेब्रुवारी अखेरीस वा मार्चच्या प्रारंभी लढतीच्या मुहूर्ताचा बिगुल वाजणार, अशी दाट शक्यता वर्तविण्यात आली. मात्र मोठ्या संख्येने हरकती व सूचना प्राप्त झाल्याने त्याचा निपटारा करण्यासाठी मुदत देण्याची मागणी करण्यात आली. त्याला मान्यता देण्यात आली असून, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. यामुळे आता मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदार याद्या 31 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही बाब पाहता निवडणूक एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.