भाजपाच्या तिसर्‍या नगराध्यक्षाही लवकरच सोडणार पक्ष!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पंधरा दिवसांतच दोन नगराध्यक्षांनी भाजपा सोडून शिवबंधन हाती बांधल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देऊळगाव राजाच्या थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा सौ. सुनिता शिंदे आणि नांदुर्याच्या नगराध्यक्षा सौ. रजनीताई जवरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यातच आता आणखी एक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पंधरा दिवसांतच दोन नगराध्यक्षांनी भाजपा सोडून शिवबंधन हाती बांधल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देऊळगाव राजाच्या थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा सौ. सुनिता शिंदे आणि नांदुर्‍याच्या नगराध्यक्षा सौ. रजनीताई जवरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यातच आता आणखी एक भाजपाच्या नगराध्यक्षा महाविकास आघाडीतील एका घटक पक्षात येत्या काही दिवसांत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
केंद्रात आणि राज्यातही सरकार असताना भाजपाला सुगीचे दिवस आले होते. या पक्षात मोठ्या प्रमाणात आयारामांची संख्या वाढली होती. मात्र सत्तेच्या समिकरणात राज्यातील सत्तेतून भाजपा बाहेर फेकली गेली आणि शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रसने एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्याआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जिल्ह्यात भाजपाला सुगीचे दिवस आले होते. ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद या निवडणुकांमध्ये कधी नव्हे तेवढे भरघोस यश भाजपाने मिळवले होते. काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश भाजपाने करवून घेतले होते. मात्र आता राज्यात सरकार नसल्याने अनेक नेत्यांनी घरवापसी केली तर काही करण्याच्या मार्गावर आहेत. नुकतेच दोन नगराध्यक्षांनी शिवबंधन बांधल्यने शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे देऊळगाव राजाच्या नगराध्यक्षांनी शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी प्रयत्नही करण्यात आले होते. मात्र सौ. शिंदे यांनी शिवसेनेलाच पहिली पसंती दिली होती. नगराध्यक्षांच्या या फोडाफोडीत आता लवकरच तिसर्‍या नगराध्यक्षांचाही नंबर लागणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दोन नगराध्यक्षा फोडल्यामुळे भाजपाच्या नेत्यांनीही चांगलेच मनावर घेतले असून, शिवसेनेच्या तालुका स्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंतच्या अनेक पदाधिकार्‍यांना भाजपात आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. अर्थात त्यात कितपत यश मिळेल हा प्रश्‍नच आहे.