पुरुषोत्तम खेडेकरांनी लिहिले, सारेच बुचकळ्यात पडले…नंतर सारवासारव, म्‍हणतात सत्तेसाठी चालतं हे पण…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडसमोर युतीसाठी भाजप हाच एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे. मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापनदिनामित्त मराठा सेवा संघाचे मुखपत्र असलेल्या मराठामार्ग या मासिकात अग्रलेख लिहून त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडल्याचे चित्र …
 
पुरुषोत्तम खेडेकरांनी लिहिले, सारेच बुचकळ्यात पडले…नंतर सारवासारव, म्‍हणतात सत्तेसाठी चालतं हे पण…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडसमोर युतीसाठी भाजप हाच एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे. मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापनदिनामित्त मराठा सेवा संघाचे मुखपत्र असलेल्या मराठामार्ग या मासिकात अग्रलेख लिहून त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडल्याचे चित्र आहे. खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून भाजप व संघ परिवारावर नेहमीच टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका बदलली का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र संघटनेची सामाजिक भूमिका कायम राहील, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. राजकारणात सध्या युती आणि आघाड्यांचा काळ आहे.स्वबळावर यश मिळवणे सोपे नाही. संभाजी ब्रिगेड म्हणजे राष्ट्रवादीचे पिल्लू अशी हेटाळणी देखील आमची झाली असे खेडेकर म्हणाले. मात्र आता काहीतरी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. त्यानुसार संभाजी ब्रिगेडने भाजपशी युती करण्याचा विचार करावा, असे खेडेकर लेखात म्हणाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पर्याय आता आमच्यासमोर उरला नाही. राजकारण राजकारणासारखं करण्यासाठी आता भाजप हाच पर्याय दिसतो, असेही ते लेखात म्‍हणाले आहेत.

एका वृत्तवाहिनीने या लेखातील भूमिकेबद्दल खेडेकरांना विचारणा केली असता संभाजी ब्रिगेडचा संघाला असलेला विरोध कायम असल्याचे त्‍यांनी सांगितले. संभाजी ब्रिगेडची युती भाजपसोबत आहे. आरएसएसशी नाही. आरएसएस आणि मराठा सेवा संघ कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले. राजसत्ता मिळवणे हेच राजकीय पक्षाचे उद्दिष्ट असते. भिन्न विचारांचे पक्ष सत्तेसाठी युती करतात, मग संभाजी ब्रिगेडने युती केली तर बिघडले कुठे, असेही खेडेकर म्हणाले.

एकीकडे ते संघ आणि भाजपवर टिका करत असताना पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखाताई खेडेकर तब्बल १५ वर्षे चिखलीत भाजपच्या आमदार होत्या. मात्र २००९ ला रेखाताईंना भाजपने तिकीट नाकारले, तेव्हापासून त्या भाजपपासून कायमच्या दूर गेल्या. २०१४ ला रेखाताई सिंदखेड राजा विधानसभेत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढल्या. मात्र शिवसेनेच्या शशिकांत खेडेकरांनी त्यांचा पराभव केला. इकडे मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात संघ आणि भाजपवर टीकेची एकही संधी खेडेकरांनी सोडली नाही. पुरुषोत्तम खेडेकरांना राष्ट्रवादीचे पाठबळ असल्याचीही चर्चा होती. संभाजी ब्रिगेडमध्ये फूट पडल्यानंतर दोन गटांत संघटनेची विभागणी झाली प्रवीण गायकवाड यांनी सामाजिक संघटना म्हणून तर खेडेकरांच्या नेतृत्वातील गटाने राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये संभाजी ब्रिगेडची राजकीय पक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. भाजपशी जवळीक साधून खेडेकरांना पुन्हा एकदा त्यांच्या पत्नी रेखाताईंना किंवा त्यांच्या चिरंजीवांना राजकारणात सक्रिय तर करायचे नाही, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. रेखाताईंचे भाजपच्या अनेक नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. या संबंधाचा उपयोग दुरावा दूर करण्यासाठी पुरुषोत्तम खेडेकर करू शकतात.