जिल्ह्यात पुढील ३ दिवस पावसाची शक्यता! हवामान विभागाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे शेतकरी अडचणीत....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात पुढील आणखी तीन दिवस ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो असे प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरने आज,६ डिसेंबरला प्रसिद्धीस दिलेल्या अंदाजात म्हटले आहे...
९ ते १० डिसेंबर रोजी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच या दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला...
 सध्याच्या ढगाळ हवामानामुळे पिकांवर रस शोषक किडिंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. म्हणून या किडींच्या व्यवस्थापनासाठी लेबल क्लेम शिफारसीत कीडनाशकांचा/कीटकनाशकांचा वापर फवारणीसाठी करावा.हरभरा पिकाला ओलीत करताना संभाव्य पाऊसमान लक्षात घ्यावे तसेच आंतरमशागत करून पीक तणमुक्त ठेवावे. प्रत्येक वेचणीनंतर कापूस सावलीत वाळवून नंतरच साठवावा.कापूस मोकळी हवा असलेल्या ठिकाणी साठवावा.ओलसर जागेत साठवणूक केल्यास कापसाला पिवळसरपणा येतो, त्यामुळे रूई आणि धाग्याची प्रत खालावते. ओलीताखालील गहु पिकाची पेरणी बाकी असल्यास, लवकरात लवकर उरकून घ्यावी.पेरणीच्या वेळी बियाणे ५ ते ६ सेंमी. पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. किमान तापमानातील अचानक बदलाने दुधाळ जनावरांच्या दुध उत्पादनात घट येऊ शकते. म्हणून दुधाळ जनावरांना प्रथिनयुक्त आहार द्यावा असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात आला आहे...