जिल्ह्यात कसा राहिला महाराष्ट्र बंद; वाचा बुलडाणा लाइव्हचा स्‍पॉट रिपोर्ट!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उत्तरप्रदेशातील लखमीपूर येथे आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ आज, ११ ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बुलडाणा, मलकापूर, मोताळा, मेहकर या शहरांत दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारनंतर मात्र व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. चिखली, खामगाव, देऊळगाव राजा, जळगाव जामोद येथे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात मात्र …
 
जिल्ह्यात कसा राहिला महाराष्ट्र बंद; वाचा बुलडाणा लाइव्हचा स्‍पॉट रिपोर्ट!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उत्तरप्रदेशातील लखमीपूर येथे आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ आज, ११ ऑक्‍टोबरला महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बुलडाणा, मलकापूर, मोताळा, मेहकर या शहरांत दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारनंतर मात्र व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. चिखली, खामगाव, देऊळगाव राजा, जळगाव जामोद येथे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात मात्र बंदचा परिणाम दिसला नाही. त्या त्या ठिकाणच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. यादरम्यान जिल्हाभरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. वृत्त लिहीपर्यंत बंददरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

बुलडाणा ः शिवसेना आमदार संजय गायकवाड बुलडाण्यात आक्रमक झाल्याचे दिसले. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेसह मुख्य रस्त्यांवरून मोटारसायकल रॅली काढली. व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. आमदार गायकवाड यांच्या आवाहनामुळे व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळला. दुपारनंतर मात्र काही व्यावसायिकांनी दुकाने उघडायला सुरुवात केली.

चिखली ः चिखलीत माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले. शहरातील डीपी रोड, बसस्थानक, कृषी उत्पन्‍न बाजार समिती या भागातून रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर, कपिल खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शंतनू बोंद्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. कृषी उत्पन्‍न बाजार समिती पूर्णपणे बंद होती. मात्र शहरातील इतर दुकाने दुपारनंतर उघडायला सुरुवात झाली होती. चिखली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

जिल्ह्यात कसा राहिला महाराष्ट्र बंद; वाचा बुलडाणा लाइव्हचा स्‍पॉट रिपोर्ट!

मेहकर-लोणार ः मेहकर व लोणार शहरात दुपारपर्यंत कडकडीत बंद करण्यात आला. आमदार संजय रायमूलकर, श्याम उमाळकर, कासम गवळी यांनी रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. त्यानंतर आमदार रायमूलकर यांनी लोणार येथील रॅलीत सहभागी होऊन व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. तुरळक दुकाने वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे महाविकास आघाडीचे गजानन कृपाळू, संतोष तोंडे, अशोक बोरकर, संदीप नवले, बाळू पाखरे, खंडू सवडतकर यांनी रॅली काढून बंदचे आवाहन केले.

शेगाव ः शेगावात आजचा बंद यशस्वी करण्यासाठी कालच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेतली. सायंकाळी शहरातील बाजापेठेत फिरून आजच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. आज सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद यशस्वी करण्यासाठी शहरात रॅली काढली. दुपारी २ वाजेपर्यंत बंद पाळण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील जलंब येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य विठ्ठल सोनटक्के, राष्ट्रवादीचे संजय गव्हांदे, शिवसेनेचे गोपाल मोहे, उत्तम घोपे, गुलाबराव मोरे, राजू दोरकर, हरिओम तायडे, विनोद मोरे, रोशन राजपूत यांनी बाजारात फेरफटका मारून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

जिल्ह्यात कसा राहिला महाराष्ट्र बंद; वाचा बुलडाणा लाइव्हचा स्‍पॉट रिपोर्ट!

सिंदखेडराजा ः सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, किनगाव राजा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सिंदखेडराजा शहरात सकाळी ११ पर्यंत कडकडीत बंद होता. दुपारनंतर मात्र काही दुकानदारांनी दुकाने उघडल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात कसा राहिला महाराष्ट्र बंद; वाचा बुलडाणा लाइव्हचा स्‍पॉट रिपोर्ट!

देऊळगाव राजा ः देऊळगाव राजा शहरात बंदला फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र होते. दुपारी १२ नंतर बहुतेक दुकानदारांनी आपापली दुकाने उघडली होती.रस्त्यावर सुद्धा नेहमीप्रमाणे गर्दी दिसून येत होती.

बंदला घाटाखाली अत्यल्प प्रतिसाद ः घाटाखाली मलकापूर मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी भाजपचे प्राबल्य आहे. मलकापुरात आमदार राजेश एकडे, हरीश रावळ यांनी व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केल्याने दुपारपर्यंत दुकाने बंद होती. मात्र खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या ठिकाणी बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदचे आवाहन केले मात्र व्यावसायिकांनी फारसा प्रतिसाद न दिल्याचे दिसेल.

जिल्ह्यात कसा राहिला महाराष्ट्र बंद; वाचा बुलडाणा लाइव्हचा स्‍पॉट रिपोर्ट!