जिल्ह्यातील नेते, पदाधिकाऱ्यांचे महामंडळ, समित्यांसाठी लॉबिंग! वाचा तिन्ही पक्षांतील कोणत्या नेत्‍याला काय हवेय…

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संघटनात्मक बदलापाठोपाठ आता विविध राज्यस्तरीय महामंडळ व समित्यांवर वर्णी लावण्यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी व नेते सरसावले असून, त्यांनी त्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे वृत्त आहे. यासाठी अनेकांनी राजधानी मुंबई ते थेट दिल्लीपर्यंत वाऱ्या सुरू केल्या आहेत. यापैकी किती जण यशस्वी होतात हे नजीकच्या काळात स्पष्ट होणार …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संघटनात्मक बदलापाठोपाठ आता विविध राज्यस्तरीय महामंडळ व समित्यांवर वर्णी लावण्यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी व नेते सरसावले असून, त्यांनी त्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे वृत्त आहे. यासाठी अनेकांनी राजधानी मुंबई ते थेट दिल्लीपर्यंत वाऱ्या सुरू केल्या आहेत. यापैकी किती जण यशस्वी होतात हे नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे.

खरीप हंगाम व पावसामुळे जिल्ह्यातील राजकारण एकदमच थंडावले आहे असे नाही! काँग्रेस व राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारविरोधात आंदोलने करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाव्यापी शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. दुसरीकडे जिल्हा काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे जोराने वाहू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने आघाडीतील सर्व पक्षांचे इच्छुक तयारीला भिडले आहेत. एकीकडे हे राजकारण चालले असतानाच मागील काही दिवसांपासून राज्यस्तरीय महामंडळ व समित्यांच्या अध्यक्ष व सदस्य नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या समावेश असलेल्या राज्य समन्वय समितीच्या यासंदर्भात बैठका झाल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांत सुमारे 27 ते 28 महामंडळ व विविध समित्यांचे वाटप, त्याची टक्केवारी (प्रमाण) निर्धारित करण्यात आली असल्याचे समजते. याबाबतीत 2 अंदाज वर्तविण्यात येत आहे. तिन्ही पक्षांना एकूण मंडळांच्या प्रत्येकी 33 टक्के वाटप होईल. दुसरीकडे शिवसेना 40 टक्के तर दोन्ही काँग्रेसला प्रत्येकी 30 टक्के वाटप असा फॉर्म्युला असल्याचे सांगण्यात येत आहे.

अनेक जण इच्छुक
दरम्यान, राजकीय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या मंडळ वा समित्यांवर वर्णी लागावी यासाठी जिल्ह्यातील तिन्ही पक्षांचे अनेक नेते इच्छुक असून, त्यांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. यासंदर्भात बुलडाणा लाईव्हशी बोलताना अनेक नेत्यांनी आपण इच्छुक असल्याची कबुली दिली. याला प्रांजळपणे कबुली देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांची वर्णी लागण्याची जास्त शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण घुमरे यांनी आपण चर्मोद्योग ( लिडकॉम) महामंडळासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या माध्यमाने न्याय देणे अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यांनी आपली पसंती सांगितली नसली तरी ते खादी ग्रामोद्योगसाठी इच्छुक असल्याचे समजते. प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांनी आपण यासाठी फारसे इच्छुक नसल्याचे सांगत आपले प्राधान्य विधानसभेलाच असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी हालचाली सुरू असल्या तरी पक्षश्रेष्ठीच काय तो निर्णय घेतील, असे सांगितले, याशिवाय तिन्ही पक्षातील अन्य पदाधिकारी देखील प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री वगळता आघाडीचे आमदार संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे यांची महत्वाच्या मंडळावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. अनेकांनी यासाठी थेट दिल्लीपर्यंत लॉबिंग सुरू केले आहे.