एकनाथ खडसेंच्या लोकप्रियतेचा राष्ट्रवादी लाभ घेणार काय? संवादमध्ये दिसून आला प्रत्यय, समर्थकांना कार्यकारिणीत स्थान देण्याची गरज
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माजी मंत्री एकनाथ खडसे यांची केवळ खानदेशच नव्हे तर बुलडाणा जिल्ह्यातही किमान घाटाखाली ताकद आहे. मात्र याचा राजकीय व संघटनात्मक लाभ बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार का, असा प्रश्न संवाद कार्यक्रमानिमित्त उपस्थित झाला आहे. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना संभाव्य कार्यकारिणीत स्थान मिळेल काय हा प्रश्नही चर्चेला आला आहे.
मागील 7 व 8 फेब्रुवारी रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा पार पडला. बुलडाण्यात 8 फेब्रुवारीला राष्ट्रवादी भवनात पार पडलेल्या बैठकांना प्रामुख्याने मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीमध्ये मास लीडर असलेल्या या ओबीसी नेत्याला रुची होती, ते स्वाभाविक पण आहे. याचे कारण त्यांच्या सुनबाई रक्षाताई खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. रावेरमध्ये मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीने जंग जंग पछाडूनदेखील जय मिळवता आला नाही. मलकापूर मतदारसंघातही राष्ट्रवादी नावालाच आहे. यामुळे मलकापूरमध्ये ताकद वाढविण्यासह रावेरमध्ये विजय साकारणे नाथाभाऊंच्या माध्यमाने शक्य होऊ शकते. भाऊंनी हाती घड्याळ बांधले असले तरी ताईंच्या हाती सध्यातरी कमळच आहे. मात्र पुढील लढतीत असेच चित्र राहीलच असे नाही. या 2 मतदारसंघांप्रमाणेच जिल्ह्यातही भाऊंची ताकद, समाजासह ओबीसीमध्ये असलेला जनाधार जिल्हा राष्ट्रवादीला पूरक ठरू शकतो. या गुंतागुंतीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी संवाद कार्यक्रमात लावलेली हजेरी महत्त्वपूर्ण व भावी बदलत्या राजकारणाची नांदी समजली जात आहे. कार्यक्रमात दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्षांनी खडसेंना दिलेला मान व केलेले स्वागत, त्यांना मिळालेल्या टाळ्या लक्षवेधी ठरले. तसेच बुलडाण्याच्या वाटेवर मोताळ्यात कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले, त्यावेळी त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष मिळाली. यावेळी जितेंद्र जैन, दिलीप नाफडे, मोबिन अहमद, यशवंत धाबे, मधुसूदन सपकाळ, सुनील घाटे, रवी बोंबटकर, प्रकाश येरवळ, शरद काळे आदी सर्व पक्षीय नेत्यांची गर्दी होती. यामुळे त्यांच्या या जनाधाराचा जिल्हा राष्ट्रवादी लाभ घेईल का, त्यांच्या समर्थकांना लवकरच गठीत होणार्या जिल्हा व तालुका कार्यकारिणीत स्थान मिळेल काय असे अनेक समोर आले आहे, याचे उत्तर नजीकच्या काळातच मिळणार आहे.