आता तेच ठरवतील कोण असतील उंद्री, निमगावचे जिल्हा परिषद सदस्य!
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील उंद्री व निमगाव जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक मार्च महिन्यात लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या लढतीत 99 हजार 928 मतदार 2 सदस्यांची निवड करणार आहेत.
चिखली तालुक्यातील उंद्री जिल्हा परिषद मतदार गटाचे प्रतिनिधित्व आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले आहे. 2019 मध्ये झालेली आमदारकीची निवडणूक जिंकल्याने त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. दुसरीकडे नांदुरा तालुक्यातील निमगाव जिल्हा परिषद गटातून मधुकर वडोदे निवडून आले होते. त्यांचे अकाली निधन झाल्याने ती जागा रिक्त झाली. कोरोना प्रकोपामुळे राजकारण व निवडणुकादेखील लॉकडाऊन झाल्या होत्या. यामुळे या निवडणुका होतात तरी कधी याकडे दोन्ही गटांतील मतदारांसह चिखली व मलकापूर मतदारसंघातील राजकारण्यांचे लक्ष वेधले होते. आता या दोन्ही जागांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे. 18 फेब्रुवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. 5 मार्चला यादी प्रमाणित करून10 मार्चला मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदार याद्या अंतिम होणार आहेत. हा कार्यक्रम लक्षात घेता मार्च महिन्यात पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. ही पोटनिवडणूक असली तरी ती भाजप व महाविकास आघाडी यांच्यातील जंगी मुकाबला ठरणार हे आताच उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर आमदार श्वेता महाले पाटील, आमदार राजेश एकडे, माजी आमदार चैनसुख संचेती, राहुल बोन्द्रे या नेत्यांमधील वर्चस्वाची लढाई ठरणार आहे. यामुळे मुहूर्त जाहीर होण्यापूर्वीच राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. नेत्यांकडून तगड्या उमेदवारांचा शोध तर इच्छुकांकडून राजकीय फिल्डिंग लावणे, संपर्क, मतदारांची चाचपणी सुरू आहे.
दरम्यान, प्रारूप यादीनुसार उंद्री जिल्हा परिषद गटात 52 हजार 444 मतदार आहेत. त्यामध्ये 27 हजार 188 पुरुष तर 25 हजार 256 महिलांचा समावेश आहे. निमगावमध्ये मतदार संख्या 47 हजार 484 इतकी आहे. यामध्ये 25 हजार 396 पुरुष तर 22 हजार 88 महिला मतदार आहेत. या याद्यांवर 26 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना प्राप्त झाल्यावर या मतदार संख्येत थोडाफार बदल होऊ शकतो. मात्र वेगवेगळ्या गावांतील या मतदारांपर्यंत कोविड च्या धामधुमीत पोहोचण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांना बरीच कसरत करावी लागणार हे उघड आहे.