‘वेटिंग’वरील धृपदरावांना अखेर मिळाली ‘अपॉइंटमेंट’! पुन्‍हा काँग्रेसमध्ये होणार दाखल

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजपामध्ये गेल्यावर आता पुन्हा काँग्रेसमध्ये परत येण्यासाठी अनेक महिन्यांपासून ज्येष्ठ नेते धृपदराव सावळे इच्छुक आहेत. यासाठी अर्थातच जिल्हा काँग्रेसचे तारणहार मुकुल वासनिक यांची “एनओसी’ आवश्यक असल्याने त्यांच्या भेटीसाठी अनेक महिन्यांपासून “वेटींग’ असलेल्या सावळेंना अखेर “बिग बॉस’ची अपॉइंटमेंट मिळाली असून, ते आज, ९ जुलैला सकाळी …
 
‘वेटिंग’वरील धृपदरावांना अखेर मिळाली ‘अपॉइंटमेंट’! पुन्‍हा काँग्रेसमध्ये होणार दाखल

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजपामध्ये गेल्यावर आता पुन्हा काँग्रेसमध्ये परत येण्यासाठी अनेक महिन्यांपासून ज्येष्ठ नेते धृपदराव सावळे इच्छुक आहेत. यासाठी अर्थातच जिल्हा काँग्रेसचे तारणहार मुकुल वासनिक यांची “एनओसी’ आवश्यक असल्याने त्यांच्या भेटीसाठी अनेक महिन्यांपासून “वेटींग’ असलेल्या सावळेंना अखेर “बिग बॉस’ची अपॉइंटमेंट मिळाली असून, ते आज, ९ जुलैला सकाळी दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त आहे.

जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते असलेले धृपदराव हे अजब रसायन असलेले गजब नेते आहेत. काँग्रेसमधील आपल्या दीर्घ वास्तव्यात त्यांनी बहुतांशवेळी काँग्रेसलाच हात दाखविले! बंडखोरी नसानसात भिनलेल्या या नेत्याने कधीकधी वासनिकांनाही जुमानले नाही. नारायण राणे यांच्या स्टाईलने राजकारण करण्यावर त्यांचा भर राहिला. काँग्रेसने आमदारकी, जि.प. अध्यक्षपद, दोन वेळा विधानसभेची उमेदवारी, एसटी महामंडळाचे संचालक असे सर्व काही दिल्यावरही ते “शांत’ राहिले नाहीत. नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय स्तरावरील राजकीय प्रवेशानंतर व राज्यात भाजपचा दबदबा (धाक) वाढल्यावर त्यांनी काँग्रेसचा हात सोडून स्वतःच्या हाती भाजपचे कमळ घेतले. रावसाहेब दानवेंच्या कृपेने थेट जिल्हाध्यक्षदेखील झाले. मात्र भाजप म्हणजे काही काँग्रेस नाही याचा प्रत्यय आल्याने व खासदारकी तर सोडा, आमदारकीच्या उमेदवारीनेही हुलकावणी दिल्याने “आता पुरे झाले मंडळी’ असे मनाशी म्हणत ते काँग्रेसमध्ये पुनरागमन करण्यास इच्छुक आहेत. वासनिकांचे निकटवर्तीय युवा नेते संजय राठोड यांची देखील त्यांना पक्षात आणण्याची मनस्वी इच्छा आहे, अर्थात त्यामागे त्यांचाही राजकीय स्वार्थ आहे. काँग्रेसमधील हर्षवर्धन सपकाळ व अन्य गटांना थोपविण्यासाठी आपल्या गटात एक मुरब्बी, अनुभवी नेता आणणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. तसेच आपण बुलडाणा तर धृपदराव चिखली विधानसभेतून अशा परस्पर वाटणीचा छुपा हेतू देखील यामागे असू शकतो. बुलडाण्यात निर्णायक संख्येत असलेल्या मराठा समाजाचे मतदान मिळवून देण्यासाठी भाऊ कामी येऊ शकतात, असा राठोड यांचा समज असावा. यामुळे ते प्रदेश उपाध्यक्ष झाल्यापासून त्यादृष्टीने (सावळेंपेक्षा ही जास्त?) धडपड करीत असल्याचे समजते. यासंदर्भात वासनिकांनी त्यांना एकदोनदा खडसावले असल्याचे समजते.

दिल्ली व्हाया मुंबई…
आताही संजय राठोड व त्यांचे मोजके विश्वासू सावळेंसोबत दिल्लीत दाखल झाले आहेत. आज सकाळच्या फ्लाईटने दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतल्याचे निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी अध्यक्ष विजय अंभोरे हे सुद्धा सध्या दिल्लीतच असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले. यामुळे कदाचित सावळे यांची राजधानीत घरवापसी होऊ शकते.

भाजपमध्येच आहोत, भाजपमध्येच राहणार : धृपदराव सावळे
माजी आमदार धृपदराव सावळे सध्या दिल्लीतच असल्याचे पक्षाच्‍या वरिष्ठ सूत्रांकडून समजत असले तरी, सावळे यांनी मात्र या वृत्ताला फेटाळून लावले आहे. आपण भाजपमध्येच असून भाजपमध्येच राहणार असल्याचा दावा त्‍यांनी केला. विरोधकांकडून राजकीय वावड्या उडवल्या जातात. सध्या आपण कामानिमित्त नागपूरला आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाच्‍या सन्मानाला ठेच पोहोचेल असे कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही. यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्‌भवत नसल्याचे ते म्‍हणाले.