हे तर निर्लज्जकुमार; बांगड्या भरा
तेजस्वीप्रसाद यादव यांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल
माफी न मागितल्यास पाच वर्षे कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
पाटणा : बिहार विधानसभेत विरोधकांनी घातलेला गदारोळ व त्यांना सरकारपक्षाने पोलिसांकरवी ओढत बाहेर काढून केलेली कथित मारहाण प्रकरण चांगलेच पेटले आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते तथा राजद नेते तेजस्वीप्रसाद यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नितीश यांनी याप्रकरणी माफी मागितली नाही तर पुढची पाच वर्षे आम्ही विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकू, असा इशारा तेजस्वी यांनी दिला आहे. हे नितीशकुमार नव्हे तर निर्लज्जकुमार आहेत. निर्लज्जकुमारजींनी सगळी लाजलज्जा सोडून दिली आहे. आमदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिला आमदारांचीही गय केली नाही. नितीशकुमार सरकारने सादर केलेल्या बिहार सशस़्त्र पोलीस विधेयकाला राजदने कडाडून विरोध केला आहे. या कायद्याअंतर्गत माजी मुख्यमंत्र्यालाही मारहाण केली जाऊ शकते. कोणतेच सरकार स्थायी असत नाही हे नितीशकुमार यांनी ध्यानात घ्यावे. आमच्या आमदारांना झालेली मारहाण कधीही विसरणार नाही.मी तेजस्वीप्रसाद आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा तेजस्वीप्रसाद यांनी दिला आहे.