‘हमारे पास राम है‘; भाजपच्या गोटात ‘फील गुड‘
मालिकेतील रामाने दाखवली भाजपशी ‘ममता
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष आणि भगवान ‘रामा‘चे अतूट नाते आहे. निदान पक्षाचा तसा दावा असतो. निवडणूक काळात अनेक कलावंतांना आपल्या मंचावर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करतात. अशाच प्रयत्नातून एकेकाळी ‘रामायण‘ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले चरित्र अभिनेते अरुण गोविल भाजपच्या गळाला लागले आहेत. अरुण गोविल यांनी रामायण मालिकेत भगवान रामाची भूमिका केली होती. ती इतकी लोकप्रिय ठरली होती की, लोक अक्षरश: देव समजून त्यांची पूजा करत असत. तर ही मालिका सुरू झाल्यावर रस्ते संचारबंदी लागल्यासारखे निर्मनुष्य होत असत. अरुण गोविल यांच्या मते भगवान श्रीराम हे पूजनीय व्यक्ती आहेत.त्यांचे नाव घेण्यात किंवा त्यांचा जयघोष करण्यात काहीच चुकीचे नाही. पण मध्यंतरी ममता बॅनर्जींनी रामाचे नाव घेण्यास, जय श्रीरामचा जयघोष करण्यास तीव्र विरोध केला होता. रामाच्या नावाने होणारी घोषणाबाजी त्यांनी बंद पाडली होती. त्यामुळे अरुण गोविल यांना ममतांचा खूपच राग आला. रामाच्या घोषणेला विरोध झाल्याने चीड येऊन आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे अरुण गोविल यांनी सांगितले. प.बंगालमधील निवडाूक मतदानाआधी अरुण गोविल पक्षात आल्याने भाजपला त्याचा चांगलाच फायदा होण्याची शक्यता आहे. या कृतीने हिंदुत्ववादी परिवार सुखावला असून ‘हमारे पास राम है‘ अशी घोषणाही ते आता देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.