लॉकडाऊन,कोरोना साथीला देवच जबाबादर म्हणत केली मंदिरात तोडफोड
नवी दिल्ली एका नैराश्यग्रस्त तरुणाचे कृत्य; पोलिसांनी केली अटक
नवी दिल्ली : लॉकडाऊन, कोरोनामुळे समाजात विविध घटकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातून अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे, अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशाच एका बेराजगार तरुणाने नैराश्यातून चक्क शिव मंदिरात दगडफेक करून वस्तूंची फेकाफेकी केली.तसेच मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. पुजार्याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीचे आरोपीचा शोध घेतला असता त्याची ओळख पटली. त्याने वरील कारण सांगितले तेव्हा पोलीसांनाही धक्काच बसला.
नवी दिल्लीतील पंजाबी बाग पश्चिम भाग परिसरातील वैष्णो माता मंदिरातील पुजारी रंजीत पाठक यांनी शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे मंदीर उघडून आत पाऊल ठेवले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. मंदिरातील वस्तू अस्ताव्यस्त फेकलेल्या आढळल्या.तसेच मूर्तीजवळ दगड, विटा फेकलेल्या आढळल्या. शिवाय महादेवाच्या पिंडीसह इतर काही देवतांच्या मूर्तींची तोडफोड झाली होती. सुरुवातीला हा प्रकार चोरीचा वाटल्याने त्यांनी ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा एक तरुण दगडफेक करत असल्याचे आढळले. पोलिसांनी परिसरात त्याचा शोध सुरू केला. काही वेळाने त्याच पोशाखातील एक तरुण परिसरात फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला अटक करून ठाण्यात आणले. चौकशीत त्याने त्याचे नाव विक्की (२८) असे सांगितले. त्याचे वडील शंभू हे भंगारचा व्यवसाय करत होते व तो त्यांना मदत करत असे. पण लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बंद पडला व ते बिहारमध्ये गावी परत गेले. त्यामुळे युवक एकटाच राहत असे. हाताला काम न मिळाल्याने तो निराश झाला. त्याची उपासमार होऊ लागली. त्यामुळे यास्थितीला देवच जबाबदार आहे. त्याच्यामुळेच कोरोनाची साथ आली, लॉकडाऊन झाले, असा समज करून घेऊन त्याने मंदिरात दगडफेक केली. तशी कबुली त्याने पोलीसांकडे दिली. ते ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.