युद्धसरावादरम्यान जीप पेटली; तीन जवानांचा जळून मृत्यू
श्रीगंगानगर : राजस्थानात भारत-पाक सीमेलगत असलेल्या श्रीगंगानगर तळावर नियमित युद्धसराव सुरू असताना लष्कराच्या एक जिप्सी जीपला आग लागली. आगीच्या घटनेनंतर बाहेर पडता न आल्याने तीन भारतीय जवानांचा होरपळून मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लष्करी सूत्रांन या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
सू़त्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. छतरगड भागात सैन्याचा नियमित युद्धाभ्यास सुरू होता.सराव सुरू असताना अचानक एक जिप्सी जीप पेटली. त्यात ठेवलेल्या जवानांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यात तीन जवानांचा मृत्यू झाला.तर इतर पाच जण जखमी झाले.सरावाच्यावेळी प्रत्येक वाहनात काही दारूगोळा, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके ठेवलेली असतात. अपघात घडल्यानंतर त्या वाहनातील साहित्य पेटल्याने आग भडकली.त्यात जवान जखमी झाले.