महा’भूकंप’! गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिले होते वाझेंना १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट
मुंबईचे माजी पोलीस महासंचालक वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीरसिंग यांचा गंभीर आरोप
मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत प्रचंड खळबळजनक घटना घडत आहेत. परंतु मुंबईचे माजी पोलीस महासंचालक परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर दर महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याची मागणी केली होती. वाझे यांना गृहमंत्री देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर बोलावून दरमहा शंभर कोटी रुपये जमा करण्याचे व ते कसे वसूल करता येतील हेही सांगितले होते. ही बैठक झाली त्यावेळी तेथे गृहमंत्र्यांच्या पीएंसह काही व्यक्ती उपस्थित होत्या. असे परमबीरसिंह यांनी म्हटले आहे. परमबीरसिंग यांच्या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष भाजपने देशमुख यांच्या राजीनाम्याची घेण्याची व प्रकरणाच्या निःपक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वाझे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर परमबीरसिंग यांचीही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.सिंग यांनी हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा दावा गृहमंत्री देशमुख यांनी केला होता. त्यामुळे ते अस्वस्थ होते. त्यांनी गृहरक्षक दलाचा पदभार न घेता रजेवर जाण्याचा पवित्रा घेतला होता. त्यावेळी सरकारने आपल्यावर अन्याय केल्याची भावना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून व्यक्त केली होती. त्या नाराजीतूनच त्यांनी आपल्यावर आरोप केल्याचा दावा गृहमंत्री देशमुख यांनी ट्विटवर केला आहे. परंतु त्यांच्या या आरोपानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची व गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत. असे आरोप राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले आहेत. त्यामुळे त्याची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी व्हावी. राज्य सरकारचा केंद्रावर विश्वास नसेल तर उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली या आरोपांची शहनिशा करावी,अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान या लेटरबॉम्बमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.