बायकोची इच्छा नसताना संबंध… हायकोर्ट म्हणाले, बलात्कार म्हणता येणार नाही!
नवी दिल्ली ः बायकोशी बळजबरीने शरीरसंबंध ठेवणे किंवा तिची इच्छा नसतानाही लैंगिक कृत्य करण्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असा निर्वाळा छत्तीसगड हायकोर्टाने दिला आहे. वैवाहिक बलात्काराच्या आरोपातून एका व्यक्तीला मुक्तही हायकोर्टाने या प्रकरणात केले. पतीविरोधात ४९८ अ व ३७७ अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांवर मात्र सुनावणी होणार आहे.
पती संबंध ठेवताना अनैसर्गिक कृत्ये करताे. अनेकदा इच्छा नसतानाही संबंध ठेवताे, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले होते. न्या. एन. के. चंद्रवंशी यांनी या प्रकरणात निकाल दिला. तक्रारकर्त्या महिलेचे आरोपीशी लग्न झाले आहे. संबंधादरम्यान इच्छेच्या विरोधात केलेले लैंगिक कृत्य बलात्कार मानता येणार नाही. त्याच्यावर बलात्काराचा आरोप ठेवता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अनैसर्गिक संभोग कलम ३७७ चा भंग असून, ४९८ अ अंतर्गत पती व सासरच्यांनी केलेल्या छळाची तक्रार मात्र न्यायालयाने स्वीकारली आहे. यापूर्वीही एका केसमध्ये केरळ उच्च न्यायालयाने मॅरिटेल रेप भारतीय कायद्यात फौजदारी गुन्हा नसल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र क्रूर, अमानवीयपणामुळे पत्नी घटस्फोट घेऊ शकते, असेही स्पष्ट केले होते.