प्रियकर दवाखान्यात… नवरीची सप्तपदी!
भोपाळ ः नवरदेवाने पत्नीच्या प्रियकराला गोळी झाडली. प्रियकर दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत असताना नवरी मात्र पतीसोबत सप्तपदी घेत होती… मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
शोपूर जिल्ह्यातील पांडोल गावात एका तरुणीचं लग्न पवन नावाच्या तरुणासोबत ठरलं होतं. दोघांचं लग्न होणार होतं. यादरम्यान प्रियकर कुलवीर उर्फ जसवीर सिंहनं पवनला त्याच्या होणाऱ्या पत्नीचं आपल्याशी कसं प्रेम आहे, हे सांगितलं. तो म्हणाला की, ती माझी आहे. लग्नाच्या अगोदरच्या दिवशी रात्री उशिरा पवननं कुलवीरला बोलवलं आणि समजावून सांगितलं. पत्नीच्या बॉयफ्रेन्डला पवन म्हणाला, की तू माझ्या होणाऱ्या पत्नीचा पिच्छा सोड. लग्नात काही अडथळा आणू नको. प्रियकर कुलवीर पवनला म्हणाला, की तिचं त्याच्यावर प्रेम आहे. हे लग्न जबरदस्तीनं लावलं जात आहे. हे ऐकताच पवनचा राग अनावर झाला. त्यानं बंदूक काढली आणि कुलवीरवर गोळी झाडली. गोळी कंबरेला लागून आरपार गेली. या घटनेनंतर अद्यापही पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. आरोपी आणि तरुणीचं लग्न झालं. तरुणावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.