पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझमचं नाव टॉप क्रिकेटर्समध्ये घेतले जाते; परंतु आता तो चर्चेत आला आहे, ते वेगळ्याच कारणासाठी. लग्नाचे आमिष दाखवून दहा वर्षे सतत बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेनं केल्यामुळं बाबरचं नाव सध्या चर्चेत आहे.
एका महिलेने बाबरवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. बाबरनं लग्न करण्याची खोटी आश्वासनं दिली. धमक्या देऊन लैंगिक शोषण केलं, असं या महिलेनं म्हटलं आहे. लग्न करतो, असं सांगत बाबरनं दहा वर्षे सतत बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे ती गरोदर राहिल्यांतर त्याने तिला मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. बाबर आणि ही महिला एकाच भागात राहत होते. ते एकाच शाळेत शिकत होते. बाबरने तिला प्रपोज केलं होतं. तिनंही त्याला होकार दिला. त्या वेळी त्याची क्रिकेटची कारकीर्द सुरू झाली नव्हती. बाबर सोबतच्या शारीरिक संबंधानंतर ती गरोदर राहिली; परंतु त्याच्या काही मित्रांच्या मदतीनं त्याने गर्भपात केला. महिलेनं याबाबत तसं सांगितलं आहे. “2017 नंतर तीन वर्षे त्याने माझा फायदा घेतला. त्यानंतर अचानक 2020 मध्ये त्याने लग्न करण्यात नकार दिला,” ही महिला म्हणते. महिलेने शोषणाचा आरोप केला असताना बाबर मात्र लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या चुलत बहिणीशी त्याचं लग्न होणार आहे. बाबर आणि त्याच्या चुलत बहिणीच्या कुटुंबीयांची या लग्नाला संमती मिळाली आहे. हे लग्न पुढच्या वर्षी होणार आहे.