पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा : 18 वर्षांवरील सर्वांचे केंद्र सरकार करणार मोफत लसीकरण; नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्यही!
नवी दिल्ली (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा)ः २१ जूनपासून देशातील सर्व राज्यांना १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी केंद्र सरकार मोफत लस उपलब्ध करून देणार आहे. लस उत्पादकांकडील लसींच्या एकूण उत्पादनापैकी ७५ टक्के वाटा हा केंद्र सरकार स्वतः खरेदी करून राज्यांना मोफत देईल. म्हणजेच देशातील कुठल्याही राज्यावर लसींच्या खरेदीचा बोजा पडणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 7 जूनला केली.
आज सायंकाळी पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केले. केंद्र सरकारने 1 मे रोजी लसींच्या खरेदीचे अधिकार राज्यांना दिले होते. यानुसार लसींच्या उत्पादनाचा 50 टक्के वाटा हा केंद्र सरकार, 25 टक्के राज्य सरकार आणि 25 टक्के खासगी क्षेत्रासाठी म्हणजे खासगी हॉस्पिटल्सना देण्यात आला होता. तसंच 18 ते 44 वर्षांदरम्यानच्या नागरिकांची लसीकरणाची जबाबदारीही राज्यांवर सोपवली होती. पण आता खासगी हॉस्पिटल्सचा 25 टक्के वाटा कायम ठेवत केंद्र सरकारने राज्यांकडील 25 टक्के वाटा आपल्याकडे घेतला आहे. लसींचा 75 टक्के वाटा हा केंद्र सरकारकडे आल्याने आता देशातील सर्व राज्यांना केंद्र सरकारकडून आधी प्रमाणे लसींचा पुरवठा होणार आहे. यामुळे देशातील सर्व नागरिकांचे केंद्र सरकारकडून मोफत लसीकरण केले जाईल, असे मोदी म्हणाले. देशात उत्पादीत होणाऱ्या लसींपैकी २५ टक्के वाटा हा खासगी क्षेत्रातील हॉस्पिटल्स थेट कंपन्यांकडून खरेदी करू शकतील. खासगी हॉस्पिटल्स लसींच्या निश्चित किंमतीवर एका डोसवर फक्त १५० रुपये सेवा शुल्क घेऊ शकतील. यावर देखरेख ठेवण्याचे काम राज्यांकडेच राहील, असेही मोदींनी स्पष्ट केले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार गेल्या वर्षी 8 महिने मोफत रेशन पुरवले. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. ही योजना आता दीपावलीपर्यंत लागू असेल. नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल, असेही मोदी म्हणाले.
राष्ट्रवादीकडून टीका…
केंद्र सरकारच्या प्रतिमेवर व निर्णयावर सुप्रीम कोर्टाने बोट ठेवल्याने अपयश झाकण्यासाठी व प्रतिमा सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जबाबदारी घेण्याची घोषणा केली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. आता सर्व वेळेत मिळेल ही अपेक्षा असल्याचे मलिक म्हणाले.