नरेंद्र मोदी २४ तास खोटे बोलतात- राहुल गांधींचा घणाघात
गुवाहाटी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे देशाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी प्रचारसभा गाजत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते दिवसाचे २४ तास खोटे बोलत असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
आसाममधील कामरूप विधानसभा मतदारसंघातील एका जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी येथे तुमच्याशी खोटे बोलायला आलेलो नाही. कारण माझे नाव नरेंद्र मोदी नाही. आसामची जनता, शेतकरी किंवा अन्य कुणाविषयीही तुम्हाला खोटे ऐकायचे असेल तर आपला टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींचे तोंड बघा. ते दिवसाचे २४ तास खोटे बोलतात. मी मात्र तसे करणार नाही.भाजप आसामच्या लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत नाही. तरुणांना कसलीही मदत करत नाही, त्यांच्यासाठी योजना आखत नाही. उलट सीएए कायद्याच्या माध्यमातून आसामी जनतेचा इतिहास, भाषा, संस्कृती, भूमीवर आक्रमण करू पाहत आहे. पण काँग्रेस हे कधीच होऊ देणार नाही. तुमच्या नागरिकत्वासह सर्व बाबींचे रक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. दुसरीकडे भाजपचे नेते व केंद्रीयमंत्री अमित शहांनी राहुल गांधींना त्यांच्या भाषणातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हे भाऊ- बहिण आसामात केवळ पर्यटनासाठी येतात.चहाच्या मळ्यात पानेही आलेली नसताना प्रियंका गांधी येथे येऊन फोटोसेशन करून जातात, अशी टीका त्यांनी केली आहे.