दहा दिवसांत सहा अल्पवयीन मुलींवर अत्याचार
बिहारमध्ये नराधम दुकानदारास ठोकल्या बेड्या
लखीसराय : बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यात माणुसकीला लाजवेल अशी घटना उघडकीस आली असून येथे एका किराणा दुकानदाराने दहा दिवसांत सहा अल्पवयीन मुलींना स्वत:च्या वासनेचा शिकार बनविल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या नराधम दुकानदारास बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेबद्दल स्थानिक वस्तीमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
पोलिसांनी सांगितले की, लखीसराय जिल्ह्यात कजरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात ५० वर्षीय दुकानदार प्रकाश तांती उर्फ रिजय तांती याचे किराणा दुकान होते. गावात एकच दुकान असल्याने तेथे ग्रामस्थांची गर्दी असे.सदर दुकानदार हा महिला व मुलींकडे वाईट नजरेने बघत असे.परंतु गेल्या दहा दिवसांत त्याने गावातील चक्क पाच ते सहा मुलींवर लैंगिक अत्याचार केले. त्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या दोन मुलींची तब्येत अचानक बिघडल्याने त्याचे बिंग फुटले. पालकांनी मुलींना विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर त्यांनी दुकानराच्या अत्याचारांचा पाढा वाचला.त्यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठून दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी गावात धाव घेऊन दुकानराला अटक केली. त्याला बेड्या ठोकण्यात आल्यावर आता त्याबाबत तक्रार देण्यास लोक पुढे येत आहेत. प्रकाश तांतीचे हे काळे कृत्य अनेक दिवसांपासून सुरू होते. पण अनेक लोकांनी मुलीच्या भविष्याचा प्रश्न असल्याने त्याबाबत वाच्यता केली नाही व तक्रारही दिली नाही. उलट मुलींना नातेवाईकांकडे पाठवून दिले. पण आता पोलीस घटनेची सखोल चौकशी करत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठाणे प्रभारी व तपास अधिकारी रीता कुमारी यांनी सांगितले.