चेंडू समजून खेळताना फुटला बॉम्ब; मुलगा जखमी
लखनौ : कधीकधी रस्त्यावर किंवा अडगळीत पडलेली वस्तू हाताळणे महागात पडते.उत्तर प्रदेशात एका लहान मुलाच्या बाबतीत काहीसा असाच प्रकार घडला. त्याने भंगारात सापडलेली एक गोल वस्तू खेळण्यातील चेंडू आहे, असे समजून तो त्याच्याशी खेळू लागला. पण तो बॉल नव्हे तर चक्क चिखलात भरलेला सुतळी बॉम्ब होता. मुलाने खेळताना तो जमिनीवर जोरात आदळल्याने त्याचा स्फोट झाला. त्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला ट्रामा केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. लखनौ शहरातील मेहंदीगंज भागात ही घटना घडली. सचिन छोटेलाल असे या १२ वर्षीय मुलाचेनाव आहे. तो सकाळी खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. ग्राऊंडवर त्याला गोल चेंडूसारखी वस्तू दिसल्याने त्याने ती उचलली व जोरात जमिनीवर आदळली. पण तो सुतळी बॉम्ब होता. तो फुटल्याने त्याचा जोरदार आवाज झाला. आवाजाने इतर मुले तेथून पळून गेली. मात्र, सचिन त्यात जखमी झाला. त्याला कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.