चारित्र्याचा संशय घेत पत्नीचे दोन्ही हात कापले
डॉक्टरांनी नऊ तास सर्जरी करून पुन्हा जोडले
भोपाळ : चारित्र्याच्या संशयाचा किडा डोक्यात गेल्यावर माणूस काय करेल काही सांगता येत नाही. मध्य प्रदेशात सागर जिल्ह्यात एका इसमाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कुर्हाडीने तिच्यावर जोरदार हल्ला केला. सपासप वार करून त्याने पत्नीचे दोन्ही हात तोडले. पण सुदैवाने डॉक्टरांनी नऊ तास अथक परिश्रम घेऊन शस्त्रक्रियेद्वारे ते पुन्हा जोडले. पण ते पूर्वीसारखे काम करू शकतील किंवा नाही हे आणखी काही दिवसांनी स्पष्ट होणार आहे़
वैद्यकीय सूत्रांनी सांगितले की, सागर जिल्ह्यात रणवीर नामक तरुणाचे घरगुती वादातून त्याची पत्नी आरतीशी भांडण झाले. त्यानंतर त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. कुटुंबियांनी मध्यस्ती करून त्यांचे भांडण सोडवले. पण काही वेळानंतर रणवीर आरतीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेला. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेथे कुर्हाड हाती घेऊन तिच्यावर जोरदार हल्ला चढवला. रागाच्या भरात त्याने आरतीचे दोन्ही हात मनगटापासून कापले व तो रक्ताने भरलेली कुर्हाड हाती घेऊन घरी परतला. कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली असता आरती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. कुटुंबियांनी तिला सागर येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पण प्रकृती गंभीर बनल्याने तिला भोपाळच्या हमिदिया रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे नऊ डॉक्टरांच्या पथकाने तब्बल नऊ तास शस्त्रक्रिया करून तिचे हात पुन्हा जोडले.