गरोदरपणात मोबाइलचा अतिवापर मुलांसाठी धोकादायक!
नवी दिल्ली ः श्वास घेण्याइतकेच मोबाइलला महत्त्व आलेय. एक दिवसही त्याशिवाय जगणे अशक्य झाले आहे. आपल्यापैकी निम्म्याहून अधिक लोक फोनशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाहीत. किशोरवयीन ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईलचं वेड लागलंय आणि गर्भवती स्त्रियासुद्धा गरोदरपणात मोबाईलचा जास्त वापर करतात. आपल्याला सर्वांना माहित आहे की मोबाइल फोन्समधून उत्सर्जित होणारे रेडिएशन आरोग्यास हानीकारक आहे आणि जर तुम्ही गर्भवती असाल तर मोबाईलचा वापर केवळ तुम्हालाच नव्हे तर तुमच्या गर्भातील बाळालाही इजा पोहोचवू शकतो. हा इशारा आम्ही नाही तर तज्ज्ञांनी दिला आहे. फोनची वाइड स्क्रीन आणि त्यातून बाहेर पडलेला प्रकाश डोळ्यांना हानी पोहोचवतो आणि काही वर्षांपूर्वी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की फोन वापरणाऱ्या गर्भवती महिलांच्या मुलांमध्ये वर्तनात्मक समस्येचा धोका वाढतो.
डेन्मार्कच्या संशोधकांनी हा अभ्यास केला. या अभ्यासात अशा महिलांचा समावेश केला, ज्यांची मुले सुमारे सात वर्षांची होती. त्यांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याबद्दल आणि त्यांच्या वागणुकीबद्दल काही प्रश्न विचारले गेले. यासह आई फोन किती वापरते हेदेखील विचारले गेले. त्यातून असे दिसून आले की गर्भधारणेदरम्यान आणि प्रसुतीनंतर ज्या स्त्रिया फोनचा जास्त वापर करतात त्यांच्यातील मुलांना हायपरॅक्टिव्हिटी आणि काही वागणुकी संबंधित समस्या अधिक आहेत. ही तर केवळ अभ्यासाची बाब आहे की फोनचा जास्त वापर केल्याने गर्भवती महिलेच्या मुलास वागणुकी संबंधी समस्या उद्भवू शकतात आणि फक्त एकाच अभ्यासाच्या आधारे ही गोष्ट पूर्णपणे बरोबर असल्याचे म्हणता येणार नाही. या अभ्यासाचे निकाल पूर्णपणे अचूक असेही म्हणता येणार नाहीत. कारण काही तज्ज्ञ म्हणतात की मायक्रोवेव्ह, टीव्ही आणि लॅपटॉपप्रमाणेच मोबाईल देखील निम्न स्तराच्या रेडिओ लहरींचे उत्सर्जन करतात. या वेव्हस एक्स-रे आणि सीटी स्कॅनरमधून देखील उत्सर्जित होतात, म्हणून मोबाइल वापरणे जन्मलेल्या बाळासाठी हानिकारक आहे, असे पूर्णपणे म्हणता येणार नाही. पण तरीही गर्भवती असताना मोबाइल अतिवापर गर्भवतींना टाळलेलाच बरा.