कोरोना लस मिळावी या मागणीसाठी ब्राझीलच्या वेश्या संपावर
आम्हीदेखील फ्रंटलाईन वर्कर्स असल्याचा दावा
ब्रासिलिया : कोरोनाचे थैमान सध्या जगभर सुरू असून त्यामुळे विविध समाजघटक धास्तावले आहेत. कोरोनातून बचाव व्हावा यासाठी प्रत्येकालाच लस हवी आहे. ब्राझीलमध्येही सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून सरकार लसीकरणावर भर देत आहे. परंतु ब्राझीमधील दक्षिणपूर्व शहर होरिझोंटे येथील वेश्यांनी आम्हाला सरकारने लसीकरणातून डावलल्याचा आरोप करत चक्क संप सुरू केला आहे. त्यांचे म्हणणे असे की, आम्हीदेखील कोरोनाच्या लढाईतील फ्रंटलाईन वर्कर आहोत. त्यामुळे लसीकरणात आम्हालाही प्राधान्य मिळालेच पाहिजे,अशी त्यांची मागणी आहे. पण मिळत नसल्याने त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून चक्क संप सुरू केला आहे.
कोरोना महामारीत वेश्यांनाही बर्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हॉटेल बंद करण्यात आल्याने किरायाने खोल्या घेऊन सेवा द्यावी लागते. पण वेश्यांच्या संघटनांच्या अध्याक्षा सीडा विएरना यांच्यामते आम्हीदेखील प्रâंटलाईन वर्कर्स आहोत. आम्ही अर्थव्यवस्था चालवतो. आमच्यामुळे समाज सुरक्षित राहतो. पण अशा स्थितीत आमच्यावर कोरोनाची टांगती तलवार आहे. त्यामुळे लसीकरणाचा डोस देण्यासाठी आम्हालाही प्राधान्य दिले पाहिजे, अशी मागणी करत वेश्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यात अध्यक्षा विएरना यांचाही पुढाकार आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाने ३ लाख ३२ हजार लोकांनी जीव गमवला असून जगात दुसर्या क्रमांकावर ही आकडेवारी आहे.