कारमध्ये “ती’ विसरली मुलीला; हाती लागला मृतदेह
फ्लोरिडा ः मोबाईल, पाकिट, चावी विसरल्याची उदाहरणं पदोपदी घडतात; परंतु मुलीला कोणी कारमध्ये विसरतं? एक महिला कारमध्ये दोन वर्षांच्या निरागस मुलीला विसरली. मुलीला तिनं सीट बेल्ट लावला होता. कारमध्ये मुलीला विसरल्याचं तिच्या सात तास लक्षातच आलं नाही. जेव्हा ती परत कारजवळ आली, तेव्हा त्या निष्पाप मुलीचा मृतदेह तिला पाहावा लागला.
जुआना पेरेझ-डोमिंगो असं या विसरभोळ्या महिलेचं नाव आहे. दोन वर्षांच्या मुलीला सात तास कारमध्ये सीट बेल्टने बांधले. त्यामुळे मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. या दोन वर्षांच्या मुलीचं नाव जोसेलीन मारिट्झा मेंडेझ आहे. या मुलीला डे केयरवर नेण्याची जबाबदारी महिलेची होती. ही महिला मुलीला डे केअरवर नेण्यासाठी आली; मात्र डे केअर सुरू नव्हते. त्यामुळे ती मुलीला स्वतःच्या घरी घेऊन गेली. मुलीला ती कारमध्ये विसरली. कारच्या आत बसलेल्या मुलीची प्रकृती खराब झाली. तीस अंश सेल्सिअस तापमानात ती गुदमरली. पेरेझ-डोमिंगो कारजवळ परत आली, तेव्हा मुलीचा मृत्यू झाला होता. महिलेनं आपत्कालीन सेवा कॉल करण्याऐवजी मुलीच्या आईला बोलावून घेतलं. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.