कणीस भाजून खाताना झोपडी पेटली; सहा बालकांचा होरपळून मृत्यू
बिहारमधील दुर्दैवी घटना; एक ठिणगी ठरली जीवघेणी
पाटणा : एक छोटीशी चूक जिवावर बेतू शकते. बिहारमध्ये मोठ्या माणसांची नजर चुकवून घरात कणीस भाजून खाणे लहान चिमुकल्यांच्या अक्षरश: जीवावर बेतले आहे. कारण कणीस भाजून खाताना उडालेल्या ठिणगीने ते थांबलेली काड्यांची झोपडी क्षणार्धात पेटली. त्यातून बाहेर पडण्याची संधीही न मिळाल्याने सहा बालकांचा अक्षरश: हेरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बिहारमध्ये घडली आहे.
बिहारमधील अररिया जिल्ह्यात पलासी क्षेत्रातील कबैय्या गावात एका कुटंबातील भावा-बहिणीसह काही मुले झोपडीत कणीस भाजून खात होते. मोठ्यांना सांगितले तर ते रागावतील,कणीस भाजू देणार नाहीत म्हणून त्यांनी दार लावून कणीस भाजणे सुरू केले. पण कणीस भाजताना ठिणगी उडाली व ती झोपडीच्या कुडावर पडली. क्षणार्धात झोपडी पेटली व त्या मुलांना बाहरे पडण्याची संधीही मिळाली नाही. मुलाची आरडाओरड व आग भडकलेली पाहून ग्रामस्थ मदतीला धावले. पण सहा मुलांचा बळी घेऊनच आग शांत झाली. ही सर्व मुले तीन ते सहा वर्षे वयोगटातील आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.