आरक्षणाबाबत 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करा; पंतप्रधानांकडे मुख्यमंत्र्यांचे साकडे!; 30 मिनिटे एकांतात चर्चा, दुसरीकडे राज्‍यात भाजपाची तातडीची बैठक

नवी दिल्ली (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, 8 जूनला दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकाळी अकराला भेट घेतली. तब्बल पावणेदोन तास बैठक चालली. या वेळी आरक्षणाबाबत 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी पंतप्रधानांकडे मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण समिती उपप्रमुख आणि …
 

नवी दिल्ली (महाराष्ट्र न्‍यूज लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, 8 जूनला दिल्ली दौऱ्यावर असून, त्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकाळी अकराला भेट घेतली. तब्‍बल पावणेदोन तास बैठक चालली. या वेळी आरक्षणाबाबत 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी पंतप्रधानांकडे मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण समिती उपप्रमुख आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. सर्व विषय पंतप्रधानांनी गांभीर्याने ऐकून घेतल्याचे ठाकरेंनी सांगितले. या भेटीवर महाआघाडीचे तीनही नेते समाधानी असल्याचेही त्‍यांनी सांगितले. भेटीत कुठलाही राजकीय अभिनिवेश नव्हता, असेही ते म्‍हणाले.

या केल्या मागण्या…
मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, पदोन्नतील आरक्षण, जीएसटी परतावा, कांजूरमार्ग इथल्या मेट्रो कारशेडसाठी जागेची उपलब्धता, पीक विमा, तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतीचे निकष बदलणे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे आदी मागण्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांकडे रेटल्‍या. आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातले महत्त्वाचे मुद्दे त्‍यांच्‍या समोर ठेवत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पीक विम्यासाठी बीड पॅटर्न राबवण्याची तसंच २४ हजार ३०६ कोटींचा जीएसटी परतावा महाराष्ट्राला लवकरात लवकर परत करावा, ही मागणीसुद्धा करण्यात आली.

ते 30 मिनिटे…
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकांतात 30 मिनिटे होते. सत्तेत एकत्र नाहीत याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. या भेटीत वावगं काहीच नाही. मी काही नवाझ शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो, असा खुलासा यावर ठाकरे यांनी केला आहे. एकीकडे हा घटनाक्रम सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर या प्रमुख नेत्यांसह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत. त्‍याचा संबंध त्‍या 30 मिनिटांशी लावण्यात सध्या राजकीय विश्लेषण गर्क आहेत.

मुख्यमंत्र्यांनी या विषयांवर पंतप्रधानांना दिले निवेदन…

  • एसईबीसी मराठा आरक्षण
  • इतर मागासवर्गीयांचे पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण
  • मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण
  • मेट्रो कार शेडसाठी कांजुरमार्ग येथील जागेची उपलब्धता : न्यायालयाबाहेर सर्वमान्य तोडगा काढणे
  • राज्यांना देय असलेली जीएसटी भरपाई
  • पिक विमा योजना : बीड मॉडेल
  • बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
  • नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे
  • १४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (शहरी स्थानिक)
  • १४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (पंचायत राज संस्था )
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे
  • राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवड करण्याबाबत