National News : धक्कादायक निष्कर्ष… ४२% तरुणांना लग्नात नाही इंटरेस्ट!
नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीत विवाहसंस्था हा कुटुंबव्यवस्थेचा पाया मानला जातो. भारतात दरदिवशी २७ हजार जोडपे विवाहबद्ध होतात. महिन्याला ही आकडेवारी १० लाखांपेक्षा जास्त असते. मात्र एका नव्या संशोधनात कुटूंबव्यवस्थेचा पाया असलेली विवाहसंस्था ढासळत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या एका संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात्मक अभ्यासात जगभरातील अनेक तरुण लग्नाच्या बंधनात अडकण्यास कचरत आहेत. अविवाहित राहून एकटे व स्वतंत्र आयुष्य घालवण्यात अनेक तरुणांनी इंटरेस्ट दाखवला आहे. अमेरिकेतील पेव रिसर्च या संस्थेने हा सर्वे केला आहे.
सर्वेनुसार अमेरिकेतील बहुतांश तरुणांना लग्नाचा कंटाळा आला आहे. २५ ते ४० या वयोगटातील ३८ टक्के पुरुषांनी लग्न केले नाही व त्यांना लग्न करण्याची इच्छा नाही, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. भारतातसुद्धा २६ ते ४० या वयोगटातील ४२ टक्के तरुणांनी लग्न करण्याची व मुलांना जन्माला घालण्याची इच्छा नाही, असं म्हटलं आहे. भारतात असा विचार करणाऱ्या महिलांची संख्या सुद्धा ४२ टक्के असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. लग्न करण्याची इच्छा नसल्याचे मोठे कारण आर्थिक परिस्थिती समोर आले आहे. महिन्याला १० हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेले ३८ टक्के तरुण लग्न करण्यास इच्छुक नाहीत. याशिवाय ज्यांचे मासिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यातील २१ टक्के तरुण सुद्धा लग्नाला राजी होत नसल्याचे अहवालात नमूद आहे. काहींना स्वतंत्र आणि मित्रांमध्ये जास्त राहावं वाटतं. पत्नी आल्यानंतर तिच्या अपेक्षा वाढतात. मनाला वाटेल तसं वागता येत नाही तर काहींना लग्नास इच्छुक नसलेले तरुण समलैंगिक असल्याचे समोर आले आहे.