शाह येत आहेत, दरवाजे बंद ठेवा..!
अहमदाबाद पोलिसांच्या अजब सूचनेने नवा वाद
अहमदाबादः अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या जाण्या-येण्याचा सामान्यांना तसाही त्रास होत असतोच. राष्ट्रपतींच्या गेल्या महिन्यातील दाै-यात दोन जणांना हकनाक प्राण गमवावे लागले. अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा महत्वाची असते; परंतु त्यासाठी सामान्यांना वेठीला धरणे चुकीचे असते. अहमदाबाद पोलिसांनी नेमके हेच केले आहे.
शाह यांना ‘झेड प्लस सुरक्षा आहे. ते अहमदाबादच्या ज्या रस्त्यावरून जात होते, त्या रस्त्याच्या बाजूच्या नागरिकांना शाह यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अजब सूचना दिल्या. नागरिकांनी आपापल्या घराचे दरवाजे, खिडक्या बंद ठेवावेत, असे ‘विनंती’वजा आदेश पोलिसांनी दिले. वेजलपूर भागात शाह यांच्या हस्ते एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भागात उंच इमारतीत राहणाऱ्या सोसायट्यांना स्थानिक पोलिसांनी लिखित आदेश काढून दरवाजे, खिडक्या बंद करण्याचा आदेश दिला. या आदेशाचं पालन न केल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आल्याची तक्रार नागरिकांनी केली. पोलिसांनी हे आदेश काढण्यात आल्याचे मान्य केले. गृहमंत्री कुठेही जात असतील तर त्यांची सुरक्षा ध्यानात घेऊन स्थानिक पोलिस अशी विनंती नागरिकांना करतात, असं पोलिस निरीक्षक एल डी ओडेदरा यांनी सांगितलं.