राम आणि कृष्णाप्रमाणेच लोक मोदींना देव मानतील
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांचे अजब वक्तव्य
नवी दिल्ली : राजकीय नेते कधी काय बोलून वादात सापडतील किंवा लोकांचे मनोरंजन करतील काही सांगता येत नाही. भाजपशासित राज्य उत्तरखंडमध्ये नुकताच खांदेपालट झाले. तेथे भाजपने राव त्रिवेंद्रसिंह रावत यांचा राजीनामा घेऊन भाजपने तीरथिंसह रावत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. मुख्यमंत्रीपद मिळाल्याने रावत यांनी जणू काही त्याची परतफेड वेगळ्या पद्धतीने केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना भगवान राम आणि कृष्णासोबत केली आहे. भविष्यात देशात मोदी हे राम आणि कृष्णाप्रमाणेच पूजनीय ठरतील. लोक त्यांची तशीच पूजा करतील, असा दावा केला आहे. एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार तीरथसिंह रावत म्हणाले, की, आज विविध देशांचे नेता पंतप्रधान मोदींसोबत फोटो क्लिक करण्यासाठी रांग लावतात,आतूर असतात. आधीच्या काळापेक्षा ही स्थिती विरुद्ध आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत यामुळे जागतिक नेत्यांना फारसा फरक पडत नव्हता. पण आता ते चित्र बदलले आहे. हा एक नवीन भारत साकार झाला असून तो मोदींनी साकार केला आहे. आधीच्या काळी लोक भगवान कृष्ण, रामाला त्यांनी समाजासाठी केलेल्या चांगल्या कामासाठी ओळखत असत, त्यांचे पूजन करत असत. भविष्यात आपले पंतप्रधानही असेच लोकांच्या आदरास पात्र ठरतील, असा दावा रावत यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे पंतप्रधान मोदी कितपत खुश झाले माहीत नाही. परंतु हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.