बोटे घालून व्हर्जिन आहे की नाही कळणार कसे?; महिला आयोगाने लिहिले पत्र!; तुम्हाला माहितेय, टू फिंगर टेस्ट म्हणजे काय?
नवी दिल्ली : हवाई दलाच्या महिला अधिकाऱ्याने सहकारी लेफ्टनंटने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. यावर हवाई दलाच्या डॉक्टरांनी पीडित महिला अधिकाऱ्याला टू फिंगर टेस्ट करण्याचा सल्ला दिला. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. हवाई दलाच्या डॉक्टरांनी दिलेल्या या सल्ल्याला महिला आयोगाने विरोध केला आहे. टू फिंगर टेस्ट करू नये, असे पत्र महिला आयोगाने हवाई दलाला दिले आहे.
विशेष म्हणजे बलात्कार पीडितेची टू फिंगर टेस्ट करण्यास भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ८ वर्षांपूर्वीच बंदी घातली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने हवाई दलप्रमुख व्ही. आर. चौधरी यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले आहे.
टू फिंगर टेस्ट म्हणजे काय?
टू फिंगर टेस्ट बलात्कारासारख्या गंभीर क्रूर कृत्याच्या यातना पुन्हा अनुभवण्यासारखे आहे. या टेस्टमध्ये बलात्कार पीडितेच्या गुप्तांगात डॉक्टर दोन बोटे घालून तपासणी करतात की ती व्हर्जिन आहे की नाही. जर दोन बोटे सहजरित्या आत गेले तर ती महिला लैंगिकदृष्ट्या सक्रिय आहे, असे समजले जाते. त्या जागी असलेल्या हायमनमुळे देखील ते समजते. मात्र या टेस्टच्या प्रकियेवर सातत्याने आक्षेप घेतला जातो. सर्वोच्च न्यायालयाने देखील या टेस्टवर बंदी घातली आहे. ही टेस्ट वैज्ञानिक नाही तसेच बलात्कार झाला किंवा नाही हे सांगणे सुद्धा या टेस्टमुळे उमजत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.