बंगाल दिदींचेच! ; ममता बॅनर्जींची हॅट्‌ट्रिक निश्चित!

कोलकाता : देशात कोरोनाचा उद्रेक झाला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचीच विजयी सलामी निश्चित मानली जात आहे. मतमोजणी सुरू असून, हाती आलेल्या निकालानुसार 202 जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पक्ष 81 जागांवर आघाडीवर आहे. याही वेळेस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी …
 

कोलकाता : देशात कोरोनाचा उद्रेक झाला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचीच विजयी सलामी निश्चित मानली जात आहे. मतमोजणी सुरू असून, हाती आलेल्या निकालानुसार 202 जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पक्ष 81 जागांवर आघाडीवर आहे. याही वेळेस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हॅट्ट्रीक निश्चित मानली जात आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, तृणमूल काँग्रेस (टीएमसी) व भाजप दोघेही विजयाचे दावे करत असले तरी ममता बॅनर्जी या सत्तेच्या जवळ जाणार असे प्राथमिक आकडे हाती येत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजप कोणताही चमत्कार घडवू शकणार नाही, असे राजकीय तज्ज्ञांचे निरीक्षण हाती येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकटीने मोदी-शाह या जोडगोळीला काट्याची टक्कर दिली होती. एकूण 294 जागांच्या या विधानसभेसाठी 27 व 29 मार्च रोजी निवडणूक झाली होती. रविवारी होत असलेल्या मतमोजणीत सध्या तरी तृणमूल काँग्रेस आघाडीवर असून, तृणमूलचे  242 पैकी 202 जागांवर उमेदवार पुढे होते. तर भाजप फक्त 81 जागांवर आघाडीवर होता. त्यातही बहुतांश जागांची आकडेवारी मतमोजणीत घसरणीला लागली आहे. अनेक जिल्ह्यात तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी विजयी रॅली काढण्यासही सुरुवात केली आहे.

एकूण जागा 292
बहुमताचा आकडा 147

सध्याचा ट्रेंड
टीएमसी 202
बीजेपी 81
कम्युनिस्ट 01
इतर 02

पश्चिम बंगाल देशाचे राजकारण बदलणार!
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार धडक दिली असून, गेल्या 10 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेपासून रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. यापूर्वी भाजपने गेली तीन दशके सत्ता सांभाळणार्‍या डाव्या पक्षांना भाजपने सत्तेतून दूर सारले होते व आता डाव्याचे अस्तित्व अगदीच नगण्य झाल्याचे दिसून येत आहे. या शिवाय, ओवेसींच्या एमआयएमनेदेखील ग्रामीण व शहरी भागात जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. या सर्वांशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाघिणीसारखी एकटीनेच टक्कर दिली होती. बंगाली जनतेने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदी व अमित शाह या जोडगोळीला रोखण्यात एकट्या बॅनर्जी या यशस्वी ठरल्या असून, त्यांच्या विजयानंतर देशातील राजकीय समिकरणे आता चांगलीच बदलणार आहेत.

गड आला पण सिंह गेला..
पश्चिम बंगालच्या अत्यंत चुरशीच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सत्ता मिळवली असली तरी, पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा मात्र अतिशय कमी फरकाने धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांचा त्यांना नंदीग्राममध्ये पराभव केला. निवडणूक आयोगाने निकाल फिरवला आहे, असा आरोप श्रीमती बॅनर्जी यांनी केला.