फाटलेल्या जीन्स घालून महिला काय संस्कार देणार?
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
डेहराडून : भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोक भगवान राम-कृष्णासारखीच पूजा करतील,त्यांना पूजनीय मानतील,असे वक्तव्य करणारे उत्तराखंडचे नुतन मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.आजकाल महिला या फाटलेल्या जीन्स घालतात. हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? महिलेच्या गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स पाहून मनात असा विचार येतो की, यामुळे समाजात काय संदेश जाईल, मुलांवर कसे संस्कार होतील? फाटलेल्या जीन्स घालून महिला काय संस्कार देणार आहेत? असा सवाल तीरथसिंह रावत यांनी केला आहे. डेहराडून येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर अनेक महिला संघटना,नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तर रावत यांनी या वक्तव्यासाठी सर्व महिलांची जाहीर माफी मागावी,अशी मागणी केली आहे. आजकाल फाटलेली जीन्स म्हणजे स्टेटस सिम्बॉल समजली जाते. व्यक्ती जितक्या फाटलेल्या तितकी ती श्रीमंत असे समजले जाते. या सगळ्यातून आपण लहान मुलांना आपण समाजाला आणि आपल्या लहान मुलांना काय शिकवत आहोत. संस्कारांची सुरुवात घरातून होते. मुलांना घरातूनच चांगले संस्कार मिळाले पाहिजेत, असे ते म्हणाले.