दिल्लीत आपच्या आमदाराची तिहार तुरुंगात रवानगी
सुरक्षा रक्षकांना मारहाणप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा कायम
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत गेल्या सात वर्षांपासून सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या आमदारास सुरक्षा रक्षकांना मारहाणीचे प्रकरण चांगलेच भोवले असून यात त्यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षेविरोधात त्यांनी केलेले अपील सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. आपच्या आमदाराला शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दिल्लीचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर एम्समधील सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी २०१६ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याने व इतर पुराव्यांचे आधारे मेट्रोपॉलिटिन न्यायदंडाधिकार्यांनी त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.त्याविरोधात त्यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते.पण न्यायालयाने साक्षीपुरावे ध्यानात घेऊन अपील फेटाळून लावत त्यांची शिक्षा कायम ठेवली. आमदार हे लोकप्रतिनिधी असून त्यांच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाचा निकाल येताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांची तिहार तुरंगात रवानगी केली.