तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलीस अधिकाऱ्याचा बलात्कार
अलवर (राजस्थान) ः पतीविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेवर पोलीस उपनिरीक्षकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील खेडली (जि.अलवर) येथे समोर आली आहे.
भरत सिंह असे या बलात्कार करणार्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. खेडली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २६ वर्षीय महिलेचा पती मागील काही दिवसांपासून वारंवार घटस्फोटाची भीती दाखवून त्रास देत होता. घटस्फोट नको असल्याने तिने २ मार्च रोजी पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी खेडली पोलीस ठाणे गाठले. ठाण्यात हजर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सिंह याच्याकडे तिने कैफियत मांडली. तिच्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी या अधिकाऱ्याने तिच्या हतबलतेचा फायदा घेतला. तुमच्या दोघांमधील वाद मिटवितो, पतीविरोधात कारवाई करतो, असे आमीष दाखवून त्याने तिला ठाण्याच्या मागील खोलीत नेऊन शरीर सुखाची मागणी केली. महिलेचा या प्रकराला विरोध असतानाही तिच्या इच्छेविरुद्ध उपनिरीक्षक सिंह याने सतत तीन दिवस बलात्कार केला. पती विरोधात कारवाई तर झाली नाहीच. उलट या अधिकाऱ्याच्या वासनेला बळी पडावे लागल्याने ती हतबल झाली. 7 मार्चला सिंह याने तिला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी महिलेने या अधिकार्याला विरोध केला. या घटनेनंतर पीडितेने सिंहविरोधात तक्रार दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी ठाण्यात धाव घेऊन चौकशीचे आदेश दिले. यात दोषी आढळल्याने उपनिरीक्षक सिंहविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.