काश्मीरमध्ये आता सर्व कार्यालयांवर फडकणार तिरंगा
उपराज्यपालांनी दिले यंत्रणेला आदेश; राज्यात पहिल्यांदाच निर्णय
जम्मू : संपूर्ण देशात शासकीय कार्यालये व सरकारी इमारतींवर तिरंगा ध्वज डौलाने फडकत असतो. शिवाय राष्ट्रीय दिनी तेथे ध्वजारोहणदेखील केले जाते. पण- जम्मू काश्मीरमध्ये ही परिस्थिती नव्हती.तेथे इतकी वर्षे सरकारी कार्यालयांवर ध्वजवंदन होत नसे. पण आता केंद्र सरकारच्या प्रयत्नांनंतर तेथे सरकारी कार्यालयांवर नियमित तिरंगा ध्वजवंदन होईल.
जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांची एक बैठक घेतली होती. त्यात त्यांनी जम्मू व काश्मीरमधील सर्व २० जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांना सर्व सरकारी कार्यालयांवर राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासाठी आवश्यक व्यवस्था तातडीने निर्माण करण्याचे आदेश दिले होते. वास्तविक इतके दिवस जम्मू- काश्मीरच्या घटनेतील कलम १४४ नुसार लाल रंगाचा एक वेगळा झेंडा (ध्वज) होता आणि तोच राज्याचा ध्वज म्हणून ओळखला जात असे. विविध समारंभाच्यावेळी त्याचेच ध्वजवंदन केले जात असे. परंतु केंद्र सरकारने काश्मीरमधून विशेष दर्जा असलेले कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता तेथे काश्मीरचा ध्वज नव्हे तर केवळ भारताचा राष्ट्रीय तिरंगा ध्वजच फडकवला जातो.यापुढे सरकारी कार्यालयांबाहेरही हाच ध्वज फडकवण्यात येणार असून उपराज्यपालांच्या आदेशानंतर त्या आशयाचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे बहुतांश जिल्हा प्रशासनाने शासकीय कार्यालये, इमारतींच्या ठिकाणी ध्वजवंदनाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.