ब्रेकिंग! केळवद येथे महिलेची निर्घृण हत्या!! दागिन्यांच्या लोभापायी खून झाल्याचा संशय
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज, १६ ऑक्टोबरला सकाळी केळवद (ता. बुलडाणा) येथे उघडकीस आली. परिस्थितीजन्य बाबी लक्षात घेता तिच्या अंगावरील दागिन्यांच्या लोभापायी हा खून झाल्याचे दिसते. कारण तिच्या अंगावरील सर्व दागिने गायब होते. घटनेने केळवद परिसरासह चिखली तालुका हादरला आहे.
गावाच्या पूर्वेला सुमारे २ किलोमीटर अंतरावर देवीचे मंदिर आहे. याच परिसरातील दरीत मृतदेह आढळला. राधाबाई हिवाळे (५७) असे मृतक महिलेचे नाव आहे. ती मागील २ दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा घटस्फोट झालेला असल्यामुळे ती एकटीच गावात राहत होती. तिला अपत्य नव्हते. १४ ऑक्टोबरला ती बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. संध्याकाळी बकऱ्या परत आल्या. पण ती आलीच नाही. त्यामुळे तिचा शोध घेण्यात येत होता. ज्या दरीत तिचा मृतदेह आढळला, त्या दरी जवळील शेताच्या मालकाला गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह सर्वप्रथम दिसला. चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.